Wednesday, October 10, 2018

लोकसभेपूर्वी जिल्हा परिषद पदाधिकारी बदल नाही


चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका
सांगली,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद पदाधिकारी बदल करणे योग्य वाटत नाही. लोकसभा निवडणूक होताच जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा विचार करू, असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपच्याच काही आमदारांसमोर दिल्याचे समजते. ही चर्चा जिल्ह्यात पसरली असून यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी बदलावर पडदा पडल्याचे संकेत मिळाले आहेत.
जिल्हा परिषद पदाधिकारी बदला- बाबत अनेक दिवसां- पासून चर्चा सुरू आहे. 12 सदस्यांनी एकत्रित येत 22 सदस्यांची पदाधिकारी बदलाची मागणी आहे. आठ दिवसांत पदाधिकारी बदला; अन्यथा जिल्हा परिषदेत भूकंप घडवू, असा इशारा दिला होता. त्याला आठ दिवस होऊन गेले तरीही काही झाले नाही. खासदार संजयकाका पाटीलही काही सदस्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले होते. मात्र खासदार श्री. पाटील यांनी रात्री उशिरा या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सोमवारी किंवा मंगळवारी मीटिंग घेण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार श्री. पाटील यांनी सांगितले. त्या दोन्ही दिवसात मीटिंग झालीच नाही. मंगळवारी राज्यातील सर्वच आमदार व खासदारांची बैठक मुंबईत बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करताना पदाधिकारी बदलाचाही विषय समोर आला. त्यावेळी लोकसभा निवडणूक होईपर्यंत बदल होणार नाही. तोपर्यंत कोणीही विषय काढू नका, लोकसभा निवडणूक होताच त्यावर निर्णय घेऊ असे स्पष्टपणे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment