Tuesday, October 2, 2018

अभ्यासात कच्च्या विद्यार्थ्यांचे आता शिक्षक होणार पालक

जत,(प्रतिनिधी)-
अभ्यासात मागे पडलेला विद्यार्थी शिक्षणाच्या स्पर्धेत मागे राहू नये यासाठी राज्यातील प्रत्येक कच्च्या विद्यार्थ्यांचे एका शिक्षकास पालकत्व स्वीकारावे लागणार आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त शालेय शिक्षण विभागावर ही आणखी एक जबाबदारी टाकण्यात आली आहे. तसेच बापूंच्या संकल्पनेतील शिक्षण देण्यासाठी 'नई तालीम' उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष कार्यानुभवाचे धडे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला एक गाव दत्तक घ्यावा लागणार आहे.
     केंद्र आणि राज्य सरकार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम आखले आहेत. त्यात शाळा आणि शिक्षकांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामध्ये 'नई तालीम', 'दत्तक गाव' आणि 'एक विद्यार्थी एक पालक' असे तीन विशेष कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहेत. कच्च्या विद्यार्थ्यांसाठी 'एक विद्यार्थी एक पालक' अशी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एका विद्यार्थ्याचे त्याच शाळेतील एका शिक्षकाला पालकत्व स्वीकारावे लागणार आहे. तसेच प्रत्येक शाळेस एक तरी गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. त्याअंतर्गत त्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी दत्तक गावात वर्षभर सामाजिक सेवा बजावयाची आहे.
     विविध उपक्रमांचेही आयोजन : वर्षभर सर्व शाळांमधून विज्ञान जत्रांचे आयोजन केले जाईल. त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन, जलसंधारण आणि सौरऊर्जेच्या. प्रसारावर भर देणार्‍या विशेष प्रकल्पांचा समावेश असणार आहे. गांधींच्या जीवनावर आधारित चित्रकला, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा शाळांनी आयोजित करावयाच्या आहेत. गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने शाळेत आयोजित केली जाणार आहेत.बापूंनी प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित, आत्मनिर्भर व मातृभाषेतून शिक्षणाची संकल्पना मांडली होती.  
    गांधींच्या या शिक्षण प्रयोगास 'नई तालीम' असे म्हटले जाते. त्यामुळे नई तालीम हा दिवस राज्याच्या प्रत्येक शाळेत पाळला जाणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना कुकर, इस्त्री, सायकल दुरूस्ती करण्यास शिकविण्यात येईल, कुलूप, पाने, स्क्रू ड्रायव्हर, प्रथमोपचार पेटी यांच्या वापराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले जातील. परिसर स्वच्छता, वृक्षांच्या बियांचे संकलन, भाज्या कापणे, अन्न शिजवणे ही कामे करवून घेतली जातील. तसेच शेतीकाम, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मासेमारी या अंगमेहनतीच्या कामांतसुध्दा शालेय विद्यार्थ्यांना सामील करून घेतले जाणार आहे

No comments:

Post a Comment