Tuesday, October 16, 2018

जत बसस्थानकात घाणीचे साम्राज्य


जत,(प्रतिनिधी)-
जतच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रमुख बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आगारप्रमुखांच्या निवासस्थानासमोरच कचर्याचा ढीग असून आजूबाजूला काटेरी झुडपे वाढली आहेत. यामुळे बसस्थानकाला अवकळा आली आहे. यामुळे बसस्थानकातील सफाई कामगार काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गळक्या, मोडक्या गाड्या, चालक-वाहकांची अपुरी संख्या, कधीही वेळेवर न सुटणार्या गाड्या यामुळे सतत चर्चेत असलेले जत आगार स्वच्छतेच्याबाबतीतही मागेच असल्याने येथील अधिकारी-कर्मचारी काय करतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पाण्याचीही व्यवस्था करू शकणार्या आगाराने स्वच्छतेकडेही दुर्लक्षच केले आहे. आगार परिसरात काटेरी झुडपे वाढली आहेत. आगारात वेळोवेळी साफ सफाई होत नाही. चक्क आगारप्रमुखांच्या निवासस्थानासमोरच घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने याठिकाणी आगारप्रमुख राहतात कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.
बेकरी, रसवंतीगृह आणि पेपरस्टॉलच्या पाठीमागे प्लास्टिक, कागदांचा, कचर्यांचा ढिग साचला आहे. याठिकाणी कधीही साफसफाई करण्यात आलेली नाही. जत-विजापूर मार्गावर रिक्षा थांबा आहे, याठिकाणी काटेरी झुडपे वाढली आहेत. या ठिकाणी लोक शौचास-लघवीला बसतात. डुकरांचा, कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळेच डासांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
(जत आगारप्रमुखांच्या निवासस्थानासमोरच असे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.)

No comments:

Post a Comment