Wednesday, October 3, 2018

एसटीची तिकीट दरवाढ अटळ


डिझेल दरवाढीमुळे रोजचा खर्च कोटीने वाढला
जत,(प्रतिनिधी)-
सर्वसामान्यांची वाहतूक वाहिनी असलेल्या एसटीला सातत्याने वाढणार्या डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. वाढलेल्या दरामुळे एसटी महामंडळाला रोज एक कोटी रुपये अधिकचे मोजावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एसटीचे चाक अधिक खोलात रूतत आहेत. डिझेलचा खर्च वाढल्याने हा खर्च भरून काढण्यासाठी प्रशासनाने तिकीट दर वाढविण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

एप्रिल 2018 मध्ये सुमारे 63.76 लिटर दराने एसटी महामंडळाला डिझेल मिळत होते. सध्या सप्टेंबर 2018 मध्ये सुमारे 71.87 लिटर दराने डिझेल मिळत आहे. वाढलेल्या दरामुळे महामंडळाला दररोज सुमारे 12 लाख 12 हजार 500 लिटर डिझेल लागते. त्यानुसार एप्रिलच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रोज 1 कोटी रूपये डिझेलसाठी जादा मोजावे लागतात. त्यामुळे एसटीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे वास्तव आहे. एप्रिलपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत गेल्याने गेल्या सहा महिन्यात महामंडळाला 100 कोटी रूपये जास्त मोजावे लागले आहेत. एसटी महामंडळाला दरवर्षी सुमारे 3 हजार कोटी रूपयांचे डिझेल लागते. हा खर्च महामंडळाच्या एकूण खर्चाच्या 37 टक्के आहे. याबरोबरच कामगारांना वेतनवाढ दिल्याने दरवषी 1200 कोटी रूपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा एसटी महामंडळावर पडत आहे. एसटी महामंडळ डिझेलचा घाऊक (होलसेल) खरेदीदार असल्याने त्यांचे दर महिन्याच्या 1 15 तारखेला बदलतात. महामंडळाचे 250 डेपो आहेत. 19 हजार बस आहेत. दिवसेंदिवस खर्च वाढत चालला असल्याने एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. लवकरच या प्रस्तवाला मान्यता मिळणार असल्याने वाढत्या तिकीटदराचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना फटका गेल्या काही दिवसांपासून डिझेल दरवाढीची घोडदौड सुरूच असल्याने डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. वाढलेल्या दराने एसटी महामंडळाचा तोटा वाढला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने दरवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळताच तिकीटदरात वाढ होईल. मात्र प्रवाशांची कोणतीच चूक नसताना तिकीट दरवाढीचा फटका मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. आधीच महागाईने ग्रासलेल्या प्रवाशांना तिकीट दराची झळही सोसावी लागणार आहे.


No comments:

Post a Comment