Saturday, October 6, 2018

जत तालुक्यात तातडीने रोहयोची कामे सुरू करा: सभापती शिवाजी शिंदे


अधिकार्यांना सूचना;पाण्याच्या टँकरबाबत कार्यवाही सुरू
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या दृष्टीकोनातून रोजगार हमीची कामे महत्त्वाची असून दुष्काळी भागातल्या या लोकांना वरदायी आहे. काही गावांमध्ये गैरव्यवहार झाल्याने ही योजना बंद झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.मात्र यामुळे पुढची कामे अढून राहू नयेत. अधिकार्यांनी रोहयोची कामे तात्काळ सुरू करावीत, अशा सक्त सूचना जत पंचायत समितीचे प्रभारी सभापती शिवाजी शिंदे यांनी दिल्या.
जत पंचायत समितीमध्ये सभापती श्री. शिंदे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामाचा आणि टंचाईचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना श्री. शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जत तालुक्यात रोहयोची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कामे लवकरच सुरू होतील. जत तालुक्यात पाऊस झाला नसल्याने लोकांना रोजगार नाही. त्यामुळे ही योजनाच त्यांना उपयोगाची ठरणार आहे. प्रामुख्याने वैयक्तिक कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच ज्या गावात ज्या गावात दहापेक्षा कामे आहेत,तिथे कामे सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे.
जत तालुक्यात जवळपास 3039 कामे प्रलंबित आहेत. अनेक कामांची चौकशी चालू आहे. तालुक्यात ज्या रोहयोच्या कामांची तपासणी झाली आहे,त्यांची बिले काढण्याचा ठराव घेण्यात आला आहे. काही कामांचे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवले आहेत. जत तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झाला नसल्याने अनेक गावांतून पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी याची पाहणी करून कार्यवाही करत आहेत. ज्या गावात शासनाच्या पेयजल योजना आहेत, त्यासंदर्भात येत्या 11 ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी अॅड. प्रभाकर जाधव उपस्थित होते.

2 comments: