Friday, October 12, 2018

जत तालुक्यात द्राक्ष,डाळिंब पिक धोक्यात


पावसाची अवकृपा;तलाव कोरडे
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यावर पावसाने यंदाही अवकृपा दाखवल्याने खरिप वाया गेले. रब्बीचीही शाश्वती राहिलेली नाही. आणि पाण्यावर असलेली द्राक्ष आणि डाळिंब पिकेही पावसाअभावी धोक्यात आली आहेत. द्राक्ष छाटण्या केल्या जात असल्या तरी पाण्याची व्यवस्था करणे अवघड जाणार आहे.
यावर्षी मान्सून संपूर्णपणे कोरडा गेला. एकही मोठा पाऊस झाला नाही. सरासरीपेक्षा निम्माही पाऊस झाला नसल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या प्रमाणात उदभवली आहे. सध्याच्या घडीला 30 हून गावांना टँकरच्या पाण्याची गरज निर्माण झाली आहे. यात आता आणखी भर पडत जाणार असल्याचे चित्र आहे.
खरिप वाया गेला. पाठोपाठ रब्बी हंगामाचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. परतीचा पाऊस इथल्या शेतकर्यांच्या पदरात काहीच न पाडता तसाच गपचीप निघून गेला आहे. एकादे वादळच आणि त्यातून पाऊस झाला तरच थोडा फार दिलासा मिळणार आहे. अन्यथा यंदा भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे. लोकांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या असल्या तरी त्यांची मेहनत आणि पैसा सगळाच वाया जाणार आहे. त्यापाठोपाठ आता द्राक्ष आणि डाळिंब पिकांवरही संक्रांत आली आहे. पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होऊ लागल्याने पिकांना पाणी कोठून उपलब्ध करायचे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
जत तालुक्यात जवळपास 13 तलाव,2 मध्यम प्रकल्प तर 9 जलसंधारण विभागाचे तलाव आहेत. हे सगळेच कोरडे पडले आहेत. यंदा पाऊस झाला नसल्याने त्यात काहीच भर पडलेली नाही.उलट  त्यात बाष्पीभवनामुळे आणखी घट झाली आहे. साहजिकच द्राक्ष आणि डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा करायचे म्हटले तरी जवळपास पाणी उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे. पुढच्यावर्षीपर्यंत बागा तग धरणे अवघड आहे.

No comments:

Post a Comment