Saturday, October 6, 2018

खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी देशोधडीला

जत,(प्रतिनिधी)-
एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईसह पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे त्रस्त झाला आहे. त्यातच आता शेतकर्‍यांसमोरही या महागाईने मोठी अडचण निर्माण केलीय. मागील 3 महिन्यात खतांच्या किमतीत तब्बल 15 ते 20 टक्के दरवाढ झाल्यामुळे आधीच निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत असताना रब्बीची तयारी कशी करायची, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उपस्थित झाला आहे.
गांधीजयंतीनिमित्त दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पाण्याचा मारा करून आंदोलन दडपण्यात आले. शेतकर्‍यांचे हिताचे सरकार असल्याचा ढोल पिटणार्‍या सरकारला पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच खतांच्या दरांवरही अंकूश ठेवण्यात अपयश आल्यामुळे राज्यकर्त्यांचे दुटप्पी धोरण उघडकीस आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तब्बल 20 टक्क्यांपेक्षा कमी-अधिक पाऊस झाला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे खरिप उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय पावसाअभावी आणि कडक तापणार्‍या उन्हामुळे रब्बी हंगामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच ज्या पद्धतीने पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढताहेत त्याचप्रमाणे दुसरीकडे शेतकर्‍यांना लागणार्‍या महत्त्वाच्या खतांच्या दरांनी मागील 3 महिन्यात मोठा उच्चांक गाठला आहे. गत तीन महिन्यात डीएपी 12 टक्के वाढ झालीय. त्यामुळे आता पिकासाठी आवश्यक खते कशी खरेदी करावी, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने भाव वाढत चाललेत, शिवाय वाढत्या दरामुळे या खतांच्या खरेदीत गतवर्षीपासून 10 ते 20 टक्क्यांपर्यंत फरक पडला असल्याचे कृषी केंद्र विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न
खरिपाच्या हंगामात राज्यातील अनेक भागांत पाऊस कमी पडल्यामुळे जवळपास सर्वच पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झालाय. त्यातच शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे मुग, उडीद, सोयाबीन यांची अद्यापही खरेदी सुरू न झाल्याने खासगीत व्यापारी कमी भावाने मालाची खरेदी करताहेत. याच पार्श्‍वभूमीवर शेतीतील उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढलेला असताना, शेतकर्‍यांना मिळणारा नफा या दोन्हीत मोठी तफावत येत आहेत. त्यातच ही खतांची सुरू असलेली दरवाढ शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारी असल्याचे शेतकरी उघडपणे बोलत आहे.

No comments:

Post a Comment