Wednesday, October 17, 2018

राजे रामराव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जत,(प्रतिनिधी)-
कोणत्याही क्षेत्रात आपणास यशस्वी व्हायचे असेल तर त्या त्या क्षेत्रातील नव नवे ज्ञान, नव-नवी माहिती ज्ञात करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. एक चांगले पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य संपत्ती आहे असे प्रतिपादन कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जी.पी.माळी यांनी केले.
    ते राजे  रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभागाच्या वतीने १५ ऑक्टोबर हा दिवस डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा  जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.  त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे हे होते.या प्रसंगी डॉ. श्रीकांत कोकरे, प्रा.सागर सन्नके, प्रा. एच.डी. टोंगारे उपस्थित होते.
     लेखन वाचन आणि चिंतन या माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या महत्वाच्या घटना आहेत असे सांगून डॉ. जी.पी. माळी पुढे म्हणाले कि, माणसं एका रात्रीत मोठी होत नाहीत तर ते परिश्रमाने मोठी होतात. युवकांनी न चुकता पुस्तके वाचली पाहिजेत कारण पुस्तके हि मस्तके फोडतात आणि पुस्तकांनी मस्तके  फुटलेली माणसंच समाज घडवितात असेही ते शेवटी म्हणाले.
          यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे  म्हणाले कि, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जीवन आदर्शवत आहे. त्यांनी रामेश्वर पासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या प्रवासाचे सारे श्रेय पुस्तकांना दिले आहे.त्यांचे जीवन जे घडले ते पुस्तकामुळेच घडले असे सांगून ते पुढे म्हणाले कि, अब्दुल कलाम यांनी वाचन हा केवळ छंद म्हणून न जोपासता जीवनाच्या वाटचालीतील एक गरज म्हणून वाचन केले पाहिजे. पुस्तके केवळ आपल्याला प्रेरित करीत नसून त्याबरोबरच ते आपल्याला ज्ञान देतात.आयुष्यात पुढे पुढे यशाच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. कारण पुस्तके वाचनाने आपले चारित्र्य चांगले निर्माण होते आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगले चारित्र्य महत्वाचे आहे असेही ते शेवटी म्हणाले.
     प्रारंभी प्रास्ताविकात  प्रा. कुमार इंगळे यांनी संत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंतचा आढावा घेऊन वाचनाचे महत्व सांगितले. स्वागत प्रा. सौ.एन.व्ही.मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दिनकर कुटे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा.सुरेख व्हसमाने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment