Sunday, October 14, 2018

मटका,जुगाराचे अड्डे,आणि आयुष्याचे मातेरे


 
   आजकाल माणसाला काम करून चार घास शांततेने खावेत. कष्टातला जो आनंद आहे, तो अनुभवावा आणि आनंदी जगावं असं काही वाटतच नाही.पैशाची हाव तर सुटलेलीच नाही,पण काम न करता ते आयते आपल्या खिशात पडावेत, अशी मात्र अपेक्षा असते. त्यामुळे लॉटर्या, मटका, जुगार यांचा खेळ फोफावला. लॉटर्यांनी आपला बर्यापैकी गाशा गुंडाळला आहे. त्याला शासकीय मान्यता असल्याने त्याला सोज्वळ स्वरुप आले आहे. लॉटरी खेळणारे फार त्याच्या आहारी जात नाहीत, मात्र मटका आणि जुगार खेळणार्यांची अवस्था फार वाईट आहे आणि तितकीच चिंताजनक आहे. कारण या जुगार-मटक्याने अनेकांचे आयुष्य बरबाद झाले आहे आणि संसार उघड्यावर पडला आहे.पण तरीही त्याचे व्यसन लागलेले लोक चार-दोन खिशात आले की, त्याचा घरप्रंपचाला उपयोग न करता थेट अड्डा गाठतात आणि पैसे लावून बसतात. शेवटी तो मटकाच. लागला तर लागला आणि नाही तर फुटला. यात नशीब फुटकं असणार्यांची संख्या अधिक असणं साहजिकच आहे. पण त्यांना सांगणार कोण? अलिकडे मटक्याचे,जुगाराचे आकडे सांगणारे प्रोफेसर गल्ली-बोळात आणि वृत्तपत्रांमध्ये बोकाळले आहेत. मटक्याचे निव्वळ आकडे छापणारी बोगस वृत्तपत्रे रोज तर कधी आठवड्यातून येत असतात. आणि त्याच्यावर अशा मटक्याच्या आहारी गेलेल्या लोकांच्या उड्या पडत असतात.
     सांगली जिल्हाच नव्हे तर राज्यात मटक्याचे अड्डे फोफावले आहेत. पोलिस त्यांची कारवाई करत असली तरी (की दाखवत असली तरी) छापामारीनंतरही हे अड्डे उघडपणे सुरू असतात. अलिकडच्या दहा महिन्यात सांगली जिल्ह्यात 205 अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आणि सुमारे साडे चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल,रोख रक्कम जप्त करण्यात आली. पण या अड्ड्यांचे समूळ उच्चाटन काही होत नाही. आतापर्यंत साडेतीनशेंवर एजंट लोकांना अटक झाली आहे आणि त्यांना सोडूनही देण्यात आले आहे. का हा मटका किंवा जुगार कायमचा हद्दपार होत नाही? अर्थात याचे उत्तर सर्वांकडेच आहे. पण मग हा कारवाईचा फार्स का? कायद्याची अंमलबजावणी काटेकोर झाली तर मटका बंद होऊ शकत नाही का? दलाल आणि बुकी सापडले की आपोआप मटक्याला आळा बसतो.

     तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मटका पूर्णपणे बंद करून दाखवला होता. मात्र त्यांच्यापश्च्यात पुन्हा मटका कधी सुरू झाला, हे कळलेच नाही. पोलिस अवैध धंद्यांना चाप लावू, असे नेहमीच म्हणत असतात. तरीही मटका, जुगार अड्डे सुरूच असतात. मटक्याच्या आहारी गेलेले किती तरी लोक घर-गाव सोडून पळून गेले आहेत. या जुगारापायी अनेकांनी मोठमोठी खासगी क्षेत्रात कर्जं करून ठेवली आहेत. त्यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा लागल्याने ही माणसे घरदार सोडून बाहेर गेली. अनेकांचे संसार बुडाले. कुटुंबाचे तीन तेरा झाले. विशेष म्हणजे स्त्रियादेखील मटका,जुगार मोठ्या प्रमाणात खेळत असल्याने चिंता करण्यासारखी गोष्ट झाली आहे. जिने संसार नेटाने चालवावा, तिनेच मटक्याने घर फोडावे, असा हा प्रकार सध्याची पिढी कोणत्या दिशेने चालली आहे, हे सांगण्याची गरज उरली नाही. पोलिस आणि राज्यकर्त्यांनी मनात आणले तर चांगले चित्र दिसू शकते,मात्र त्यासाठी इच्छाशक्ती हवी. आणि तिचाच अभाव सर्वत्र दिसत आहे.No comments:

Post a Comment