Sunday, October 7, 2018

जाडरबोबलाद येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

जत,(प्रतिनिधी)-
जाडरबोबलाद (ता. जत) येथील  केंद्रशाळेत  शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी अध्ययन स्तर आणि अध्ययन निष्पत्ती यावर राबवण्यात आलेल्या उपक्रमांची चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी पंचायत समिती जतचे  कन्नड माध्यम शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख बसवराज बडीगेर होते.सोन्याळ लकडेवाडी आणि जाडरबोबलाद परिसरातील  प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक, मुख्याद्यापक सहभागी झाले होते.
     यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.बडीगेर म्हणाले की, अवघड विषय विद्यार्थ्यांना सोपा करून  शिकवण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करायला हवा. यातून मुलांना चांगला फायदा होतो. याच कल्पना, पद्धती अन्य शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  शिक्षण परिषदेचे आयोजन महत्त्वाचे आहे. राज्य शिक्षण विभागामार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्वच 100 टक्के मुले शिकण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात शिक्षण परिषदेचाही समावेश आहे. यात प्रगत शाळा, डिजिटल शाळा, एबीएल शाळा, मोठ्या प्रमाणात समाज सहभाग मिळविणाऱ्या शाळा, आयएसओ मानांकन प्राप्त शाळांमधील शिक्षकांचे  सादरीकरण करण्यात येईल. शाळा प्रगत करणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे मनोगत  यात होईल. तसेच केंद्रांतर्गत शिक्षकांमधील शैक्षणिक विचारांचे आदानप्रदान सुरू राहील. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना नव्या आचार विचारांचे आदान प्रदान करण्यात सोयीचे ठरणार असल्याची माहिती बडीगेर  यांनी दिली.
     यावेळी एम. पी. तेली,सिदराया चिकलगी, सिद्धेश्वर कोरे, रामचंद्र पांढरे यानी विविध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले. रमेश राऊत, राजेश भोजने, लखन होनमोरे, भीमराय बिरादार, डी.सी. बाजी, बी. के. जोग,धानाप्पा शिंगे, उमेश लिगाडे,सिकंदर शेख, दादा कोडलकर, रमेश धायगोंडे  आदी शिक्षक   उपस्थित होते. विठ्ठल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

No comments:

Post a Comment