Friday, October 12, 2018

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू :विलासराव जगताप

जत,( प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आमदार विलासराव जगताप यांची जत तालुका 'शिक्षक भारती'च्या' शिष्टमंडळाने भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली.यावेळी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे श्री.जगताप यांनी सांगितले.
जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडील गटशिक्षणाधिकारी पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्याचबरोबर दोन विस्तार अधिकारी, दहा केंद्रप्रमुख, तीन लिपिक, शिपाई  यासारख्या महत्त्वाच्या जागा रिक्त आहेत. त्यामु़ळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.ही  शिक्षकांचीही पदे रिक्त आहेत. रिक्त असणारी सर्व पदे तात्काळ भरून शिक्षण विभागास न्याय द्यावा ही प्रमुख मागणी करण्यात आली.  त्याचबरोबर शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत  करण्यासाठी कॅम्प लावून विविध प्रकारच्या नोंदी सेवापुस्तकात करण्यात याव्यात,  शिक्षकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी मेडिकल ,पगार फरक ,वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,प्रसूती रजा फरक इ. विविध प्रकारची बिले लवकर मिळावेत, अशी मागणीही मांडण्यात आली. यावेळी  शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून ते मार्गी लावू ,असे आमदार जगताप यांनी सांगितले
            यावेळी 'शिक्षक भारती'चे अध्यक्ष दिगंबर सावंत,शौकत नदाफ,अविनाश सुतार,मल्लय्या नांदगाव,बाळासाहेब सोलनकर,सुभाष मासाळ, दयानंद रजपूत ,विनोद कांबळे इ पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment