Sunday, October 21, 2018

जतला म्हैसाळच्या पाण्याची प्रतीक्षा


तहान घालवण्यासाठी टँकरला पाण्याची गरज
जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले होते,पण शेतकर्यांनी पाणीपट्टी भरली नसल्याने ते पुढे सरकरले नव्हते.त्यामुळे जतला म्हैसाळचे पाणी कधी मिळणार याची प्रतीक्षा होती. आता पाचव्या टप्प्यातून जतसाठी पाणी सोडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पुढचे काही दिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
अपुर्या पावसामुळे पाणीटंचाई जाणवू लागल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायती क्षेत्र अवलंबून असलेले शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. सप्टेंबर महिन्यात ताकारी, टेंभू व म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. खंडित वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेच्या 20 हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी पाण्याची मागणी नोंदविण्याच्या प्रतीक्षेत आवर्तन रखडले होते. पहिल्या टप्प्यातील 14, दुसर्या टप्प्यात 17, तिसर्या टप्प्यात 12, चौथ्या टप्प्यात 10 व पाचव्या टप्प्यातील 5 पंपांद्वारे मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत असून, सोमवारी पाणी जतपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले आहे.
 म्हैसाळच्या मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदवून पैसे भरणार्या शेतकर्यांसाठी डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालवे सुरू करण्यात आले आहेत. आरग ते लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आरगच्या शेतकजयांनी वारणाली येथे खा. संजय पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी व म्हैसाळच्या अधिकाजयांची बैठक घेऊन खा. संजय पाटील यांनी, शेतकजयांना पाणीपट्टीची रक्कम भरण्याचे आवाहन केले.
जतला पाण्याची गरज
जत तालुक्यात खरिप आणि रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. तालुक्यातून 25 पेक्षा जास्त गावांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पाठवले आहेत,मात्र प्रशासनाने ते अडवून धरले आहेत. आता त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्हैसाळचे पाणी जतला सोडण्यात आल्याने सांगोला मार्गाला पाणी जाईपर्यंत बिरनाळ,शेगाव,प्रतापपूर असे काही तलाव आहेत, ते भरून घेण्यास मदत होणार आहे. मागच्या वर्षी जतच्या बिरनाळ तलावातून तालुक्यातल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.

No comments:

Post a Comment