Wednesday, October 3, 2018

यंदा राज्यात खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट


जत,(प्रतिनिधी)-
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने सांगली जिल्ह्याबरोबरच राज्यातील खरीप पिकांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असून पेरणीतही घट झाली आहे. राज्यात खरिपाची 84 टक्क्यांवरच पेरणी झाली आहे. त्यामुळे पेरणीत सोळा टक्के घट झाली आहे.
यंदा सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये तर पाऊसच झाला नाही. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सोलापूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. यंदा राज्यात सरासरीच्या 77.40 टक्केच पाऊस झाला असून महाराष्ट्रातील 164 तालुक्यात 75 टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. अपुर्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये आजमितीस अवघा 65.37 टक्केच पाणीसाठा उरला आहे. पाणी टंचाईमुळे आता राज्यातील 331 गावे आणि 471 वाड्या-वस्त्यांवर 85 सरकारी, तर 244 खासगी अशी एकूण 329 टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जत,कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, मिरज आणि तासगाव पूर्व भाग या दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यातून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याचीही आता कमालीची टंचाई जाणवत आहे. जत तालुक्यातून 22 गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. बर्याच दिवसांच्या उसंतीनंतर परवा परतीच्या पावसाने जाता-जाता जिल्ह्यात फक्त एकच दिवस  चांगली हजेरी लावली.पण पुन्हा पाऊस गायब झाला आहे. शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे.
 दुष्काळी पट्ट्यातील जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यात रब्बी हंगामाचे मोठे क्षेत्र आहे. काही ठिकाणी रब्बी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी खरिपाच्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची मळणीही सुरू झाली आहे. जत तालुक्यातील काही भागात रब्बीच्या शाळू आणि बाजरीच्या पेरण्या सुरू झाल्याचेही चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला वरदान ठरणार्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या आवर्तनाकडे शेतकर्यांच्या नजरा लागून राहिल्या असून ताकारी सिंचन योजनेतून आवर्तन सुरू झाले आहे. परंतु म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन अद्याप रखडले असून याचा फटका शेतकर्यांना बसू लागला आहे. पाटबंधारे विभागाने शेतकर्यांना पाणी मागणीचे अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. मात्र याला सुमार प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यासह राज्यात यंदा खरीप पिकांना फटका बसण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यास रब्बीचा हंगामही धोक्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वांचीच काळजी वाढली आहे.

No comments:

Post a Comment