Tuesday, October 16, 2018

जत- आटपाडी एसटी सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून आनंद


जत,(प्रतिनिधी)-

जत- आटपाडी ही मुक्कामी एसटी बस सुरू झाल्याने या मार्गावरील शेगाव, वाळेखिंडी, बेवनूर, कोळा, जुनोनी, पात्रेवाडी, शेटफळे या गावांमधील लोकांची चांगली सोय झाल्याने या परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या गावांमध्ये जत आगारप्रमुख आणि सांगली जिल्हा नियंत्रक यांचे अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला आहे.
जत- आटपाडी या एसटी बस सेवेमुळे जत, आटपाडी या तालुक्यांसह सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. या मार्गावर पहिल्यांदाच एसटी बस धावत असल्याने अपंग, ज्येष्ठ नागरिक या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा विभाग नियंत्रक श्री. ताम्हणकर, जत आगारप्रमुख तेजस बुचडे, नौशाद तांबोळी, जगदीश कुलकर्णी यांच्या प्रयत्नामुळे जत आगाराने मुक्कामी बस सुरू केली आहे. रोज सायंकाळी 5:35 वाजता ही गाडी जत आगारातून सुटणार असून रात्री 8:30 वाजता आटपाडीला मुक्कामाला जाईल. दुसर्या दिवशी आटपाडीतून ही गाडी 6:45 वाजता सुटणार असून 9 वाजता जत येथे पोहचेल. या एसटी बसचा लाभ सांगली, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक सीमावर्ती भागातील प्रवाशांना होणार आहे.
नुकतेच कोळा येथे जत-आटपाडी एसटी बसचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभाकर वाले यांनी जत आगारप्रमुख तेजस बुचडे यांचा सत्कार केला. तसेच पेढे वाटून एसटीचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. सादिक पटेल, यशवंत शितोळे, अंकुश आलदर, समाधान बोबडे, दिलीप कोळेकर, श्री. जाधव, श्री. बेणापुरवाले, दत्ता माने, अक्षय पोरे, तात्या इमडे, हरिभाऊ आलदर, अशोक आलदर, रावसाहेब आलदर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment