Friday, October 5, 2018

युवक काँग्रेसचा जत तहसील कार्यालयावर मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून मागेल त्या गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळावेत, खरीप पिकाची नुकसान भरपाई मिळावी, जनावरांना चारा छावणी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जत तालुका युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
जत येथील मार्केट यार्ड परिसरातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. एसटी स्टँड मंगळवार पेठ, शिवाजी पेठ मार्गे दुपारी बारा वाजता मोटारसायकल चालवत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आला. या मोर्चात काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बिरादार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, बाबासाहेब कोडग, नाना शिंदे, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, ईराण्णा निङोणी, नाथा पाटील, सौरभ पाटील, विकास माने, उपाध्यक्ष गणी मुल्ला, नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनावर, नगरसेवक नीलेश बामणे, बाळासाहेब बामणे, श्रीशैल पाटील, अविनाश गडीकर, युवराज निकम, योगेश होनमाने उपस्थित होते.
काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत म्हणाले, जत तालुका हा दुष्काळाने होरपळत असताना एकाही गावात पिण्याचे पाण्याचे टँकर दिले नाहीत. जत तालुक्याच्या आमदारांनी व त्यांच्या पदाधिकार्यांनी दुष्काळासंदर्भात एकही आढावा बैठक घेतली नाही. त्यामुळे या तालुक्यातील जनता संतप्त झाली असून येत्या आठ दिवसांत दुष्काळासंदर्भात उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब बिरादार म्हणाले, जत तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून प्रत्येक शेतकर्यांना हेक्टरी नुकसानभरपाई द्यावी; तसेच मागेल त्या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर द्यावे, जनावरांना चारा छावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण म्हणाले, जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा.

No comments:

Post a Comment