Saturday, October 13, 2018

निसर्गाच्या लहरीपणामुळं शेतकर्‍यांचं निघालं दिवाळं


जत,(प्रतिनिधी)-
दर दोन वर्षांनी पडणारा दुष्काळ, मागील चार वर्षांत सतत कोसळत असलेले कृषिमालाचे दर, इंधन दरवाढ व अनिश्चित बाजारपेठ यामुळे शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे.  यंदाही दसरा-दिवाळी सणांवर दुष्काळाचं  संकट उभं राहिलं आहे. शहरांमध्ये पगारदार व उद्योगांमुळे व्यवसाय होत आहेत व सणही धूमधडाक्यात साजरे होताना दिसतात, मात्र ग्रामीणमधील परिस्थिती खूपच बिकट होत आहे. शेतकर्यांनी सण साजरे कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

श्री गणराय आले आणि गेले पण त्यांनाही यंदा पाझर फुटला नाही. पर्जन्यराजाने बहुतांश तालुक्यांकडे पाठ फिरविली. आता शक्तिदेवींचा उत्सव सुरू आहे तरीही पावसाचा पत्ता नाही. यामुळे यंदा दुष्काळाची छाया आणखी गडद होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर दुष्काळ परिस्थिती ही दर दोन ते तीन वर्षांनी येतच आहे. 2015-16 चा दुष्काळ सरून आणखी दोन वर्षे होतात न होतात तोच यंदा पुन्हा पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. मोठ्या धरणांमध्ये पाणी असले तरी ग्रामीण भाग ज्यावर अवलंबून असतो ते लघू व मध्यम प्रकल्पांमधील साठे तळाला गेले आहेत. यामुळे सिंचनाचे मोठे नुकसान होत आहे.
आता दसरा व दिवाळी तोंडावर आहे. बाजारपेठा सणांसाठी सजू लागल्या आहेत. याची धूम शहरी भागात मोठी असून ग्रामीणमध्ये अद्यापही शांतता आहे. मोठ्या शहरांमध्ये मॉल संस्कृती रूजू लागली असून पगारदार व तेथील उद्योगांवर-व्यवसायावर  त्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. शासकीय कर्मचार्यांबरोबरच खासगी क्षेत्रातील कंपन्यातही सतत पगारवाढ होत असल्याने शहरांमध्ये ग्रामीण भागाप्रमाणे आर्थिक प्रश्न भेडसावत नाहीत. आता सणांची तयारी शहरी सुरू आहे,पण ग्रामीण भागातील शेतकर्यांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. पगारदार मंडळींचे लक्ष दिवाळी तोंडावर आली की बोनसवर असते तर अनेक ठिकाणी सानुग्रह अनुदान दिले जाते. खासगी क्षेत्रातही नोकरदारांना खूश ठेवण्यासाठी बोनस दिलाच जातो. यावरच दिवाळीचा बाजार फुलतो. मात्र अन्नदात्या शेतकर्यांना दिवाळीसाठी बोनस मिळत नाही.
सध्या देशात ऑनलाईन बाजार चांगला भरला असून अनेक नामांकित कंपन्या यात उतरल्या आहेत. अगोदरच ग्रामीण भाग हा अर्थकारणात मागे जात असताना या ऑनलाईनचा फटका त्यांना बसत आहे. अनेक प्रकारच्या वस्तू या थेट मागविण्यावर तरूणाईचा भर असून छोट्या छोट्या शहरांमध्ये या कंपन्यांनी आपले जाळे विणल्याने लाखो रूपये गुंंतवून व्यवसाय थाटलेल्यांची कुचंबणा होत आहे. आता दसरा व दिवाळी सण तोंडावर असून यावेळी ऑनलाइन खरेदीसाठी झुंबड असते. मोबाइल, कपडे, बूट, गॉगल्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासाठी तर ऑनलाइनलाच वापर होताना दिसत आहे.
ऐन दसरा दिवाळी सणाच्या पूर्वी मोठ्या कंपन्या हे वस्तूंच्या किमती कमी करतात व सेल लावतात. सध्या याची सुरूवात झाली असून ग्रामीणमधील बहुतांश लोकांना याचे आकर्षण असते. हा सेल सुरू होताच खरेदीला ही मंडळी शहरात जाताना दिसतात. यामुळे गावातील व निमशहरातील व्यावसायिकांसाठी ही मोठी स्पर्धा झाली आहे. मोठ्या कंपन्या जास्त प्रमाणात वस्तू विकत असल्याने त्यांना दर कमी करणे परवडते. पण तशी स्थिती छोट्या दुकानदारांची नसते.
मागील तीन वर्षांत कृषिमालाचे दर सतत कमी होत राहिले आहेत. भाज्यांचे भावही कोसळत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारणे खूपच अवघड झाले आहे. एका बाजूला सरकार शेतकर्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देण्याची घोषणा करत आहे तर धान्य व डाळींच्या आधारभूत किमती वाढविण्यात आल्या आहेत. तरीही ग्रामीण अर्थव्यवस्था रूळावर का येऊ शकत नाही? हा मोठा प्रश्न सर्वांना आहे. खरिप गेला, रब्बीची शास्वती राहिली नाही.त्यामुळे यंदाची दसरा-दिवाळी बळीराजासाठी सण नसून निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवाळं घेऊन आली आहे.

2 comments: