Friday, October 12, 2018

बेवनूरचा टेंभू योजनेत समावेश करण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बेवनूर या गावास म्हैसाळ योजनेऐवजी टेंभू योजनेतून पाणी द्यावे व जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे शिष्टमंडळ पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना भेटले. बेवनूर या गावास सद्यःस्थितीत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक वर्षांपासून टेंभू योजनेत समावेशाची मागणी आहे.
याबाबत महादेव जानकर यांनी अधिकारी समावेत बैठक घेतली असता सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मारुती सरगर यांनी दिली. सरगर म्हणाले, पूर्वी बेवनूरचा म्हैसाळ योजनेत समावेश होता. योजनेतून लाभ क्षेत्र अत्यल्प म्हणजे 360 हेक्टर क्षेत्र होते. टेंभू योजनेत समावेश केल्यास सुमारे 1500 हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर शासनाचे या योजनेचे सुमारे चार कोटींच्या निधीची बचत होणार आहे.
 टेंभूचे पाणी ढालगाव परिसरातील दुधेभावी तलावात आले आहे. हे अंतर एक किलोमीटर आहे. ते सायपन पध्दतीने बेवनूरमध्ये सोडणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.तसा अहवाल महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाने दिलेला आहे. या योजनेत समावेश करण्याबाबतचे शिफारसपत्र मंत्री जानकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिले आहे. जत तालुक्यातील भयावह दुष्काळ बाबत चर्चा करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. बेवनूर येथील पशुवैद्यकीय दवाखानास व भुयारी गटर योजनेकरिता निधी तसेच तालुक्यातील विकास कामास गती देणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. यावेळी रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील, फेटा फौंडेशनचे अध्यक्ष संतोष वाघमोडे, माजी सरपंच मारुती सरगर, दादासाहेब वाघमोडे, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment