Monday, October 22, 2018

एसटी प्रवास योजनेतील सवलतीमध्ये बदल


जत,(प्रतिनिधी)-
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील विविध सामाजिक घटकांना देण्यात येणार्या प्रवास योजनेतील सवलतीमध्ये बदल केला आहे. यामध्ये विविध शासकीय पुरस्कार व्यक्ती, विद्यार्थिनी मोफत पास, ज्येष्ठ नागरिक, क्षय, कर्करोग, कुष्ठरोग, अंध, अपंग पत्रकार, आजी माजी विधान मंडळ सदस्य यांचा समावेश असून या लाभार्थींना स्मार्ट कार्ड मिळणार आहे.
 महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून राज्यातील सवलत योजनेमधील कार्यपद्धतीत बदल केला आहे. चौदा सवलतींचा समावेश आहे. यामध्ये मुलींना व तंत्र शिक्षणातील विद्यार्थ्यांना 66 टक्के सवलत भाड्यात दिली जाणार आहे. तसेच विविध क्रीडा पुरस्कारप्राप्त पुरस्कर्तींना निमआराम व वातानुकूलित बसमध्ये अमर्याद किलोमीटर सवलत देण्यात आली आहे. तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमर्याद असणारी प्रवास सवलत आता चार हजार किलोमीटर करण्यात आली आहे. क्षय, कर्क, कुष्ठ रोगांनी ग्रस्त व्यक्तींना 75 टक्के सवलत मिळणार आहे. हिमोफिलियाग्रस्त रुग्णास 150 किलोमीटर प्रवास महिन्यातून दोन वेळा लागू करण्यात येणार आहे. 100 टक्के अंध व्यक्तीस 65 टक्के, तर साथीदारास 50 टक्के सवलत लागू केली आहे. शिवाय राज्यातील पत्रकारांना राज्यात अमर्याद प्रवास विनामूल्य सवलत देण्यात आली आहे. या सर्वच लाभार्थींना स्मार्ट कार्ड देण्यात येणार असूनते आधार कार्डाशी लिंक करण्यात येणार आहे. मात्र स्मार्ट कार्ड मिळेपर्यंत सध्याची सवलत लागू राहणार आहे.

No comments:

Post a Comment