Saturday, October 20, 2018

दोन दिवसांत देणार टंचाईच्या सवलती: चंद्रकांत पाटील


जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील 172 तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असून दोन दिवसांत या तालुक्यांना टंचाईच्या सवलतींचा लाभ दिला जाईल. तर 31 ऑक्टोबरनंतर सर्व्हे व दुष्काळाच्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर केला जाईल, यासाठी केंद्राच्या मदतीची वाट पाहिली जाणार नाही, असे प्रतिपादन महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत येथे बोलताना केले.
जत तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने येथे आयोजित सत्कार सोहळा आणि बूथ पदाधिकाऱयांच्या बैठकीत ना. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजयकाका पाटील होते. सुरूवातीस जत तालुक्याच्या विभाजनाचा पहिला टप्पा पूर्ण केला व जतला रस्ते विकासास सुमारे सहाशे कोटीचा निधी दिल्याबद्दल  ना. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर खा. संजयकाका पाटील यांना कॅबीनेट मंत्रीपदाचा दर्जा आणि सौ. नीता केळकर यांची वीज मंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख, सौ.  नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, शिक्षण सभापती तम्मणगौडा रवि, डॉ. रवींद्र आरळी, ऍड. श्रीपाद अष्टेकर, चंद्रकांत गुड्डोडगी, सौ. ममता तेली, सुशिला तावंशी, सौ. स्नेहलता जाधव, श्रीदेवी जावीर, रेखा बागेळी, सरदार पाटील, आप्पासो नामद, अशोकराव पाटील, लक्ष्मण बोराडे, राजेंद्र कन्नुरे, विजय ताड, उमेश सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर आम्ही रस्ते विकासाला मोठी चालना दिली आहे. दोन वर्षात राज्यातील सगळे रस्ते चकाचक आणि खड्डेमुक्त होतील. रस्त्याचे बजेट 1700 कोटीवरून सहा हजार कोटीपर्यंत नेले आहे. केंद्राने एक लाख सहा हजार कोटी नॅशनल हायवेसाठी दिले. तर मुख्यमंत्र्यांनी तीस हजार कोटी रूपये दिले आहेत, त्यामुळे येत्या दीडेक वर्षात राज्यातील रस्त्यांचे चित्र वेगळे असेल.
दरम्यान, गेल्या चार वर्षात राज्यातल्या सरकारने आणि साडे चार वर्षात केंद्रातल्या सरकारने खूप चांगली कामगिरी केली आहे. लोक भाजपच्या कामावर प्रभावित आहेत. त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत, त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने काहीही आरोप करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गांगरून जाण्याची गरज नाही. पुढचे वर्ष निवडणुकांचे असल्याने भाजपा पदाधिकाऱयांनी भाजपाची कामे लोकांपर्यंत पोहोचावीत असेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने विजेची समस्या निर्माण झाली आहे. परंतु दिवाळीपर्यंत हे सुरळीत होईल. तसेच राज्यातील 24 हजार कोटींचे सिंचन प्रकल्प अपुरे आहेत, ते लवकरच पूर्ण होतील. शेतकऱयांना चांगला हमीभावही आम्हीच दिला आहे. केंद्र व राज्य सरकार पन्नास टक्के शेतीमाल हमीभावाने खरेदी करण्याच्या विचारात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही योजना प्रभावी राबवली. राज्यात सोळा हजार गावात जलयुक्तची कामे झाली आहेत, त्याचा फायदा चांगला होत असून बावीस टक्के शेती उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
 जतला टंचाईच्या सवलती सुरू करणार
जतच्या भीषण दुष्काळाची सरकारला जाणीव आहे. दोन दिवसात जतेत टंचाईच्या सगळया सवलती सुरू होतील. म्हैसाळचे पाणी टंचाईतून सोडले जाईल. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात येतील. 31 ऑक्टोबरनंतर राज्यातील 172 तालुके दुष्काळी जाहीर करण्यात येणार आहेत, यात जतेचा समावेश असेल. पेंद्रानेही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, राज्य सरकार केंद्राच्या मदतीची वाट न पाहता दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभे राहील अशी ग्वाही चंद्रकांतदादा यांनी दिली. तसेच मुचंडीसह अकरा गावे जतला जोडणे, संख अप्पर तहसीलला जादा कर्मचारी देणे आणि पूर्वच्या 42 गावांना कर्नाटकातून पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
 . जगतापांना मंत्री करा : खा. पाटील
खा. संजयकाका पाटील यांनी आपल्या भाषणात जतचे आमदार विलासराव जगताप यांना मंत्री करण्याची आग्रही मागणी ना. चंद्रकांतदादा यांच्याकडे केली. . जगताप रोखठोक आहेत, पण ते कामसू आमदार आहेत. प्रशासकीय कामाचा चांगला अभ्यास त्यांना आहे. त्यामुळे भले तुम्ही जिल्हयाला दोन मंत्रीपदे द्या, पण त्यात आ. जगताप असायला हवेत असे खा. पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पुढच्या ऑक्टोबरपर्यंत म्हैसाळ, ताकारी, टेंभूची पोटकालव्यासह सर्व कामे पूर्ण होतील, त्यामुळे आता हा भाग शंभर टक्के ओलिताखाली येण्यास अडचण राहणार आहे. पूर्वभागाच्या 42 गावांसाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात आमदार विलासराव जगताप यांनी प्रामुख्याने जत तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली. तसेच दोन शेतकऱयामध्ये एक टीसी देण्याची कार्यवाही तातडीने व्हावी, मुचंडीसह अकरा गावे जत तहसीलला जोडणे, येळवी भागातील गावे जत वीज मंडळास जोडणे आदी मागण्या केल्या. तसेच जत तालुक्यात भाजपाच्या बूथ कमिटयांची कामे चांगली सुरू आहेत. या सरकारने गेल्या साठ वर्षात जतेला जितका निधी मिळाला नाही, तेवढा या सरकारने दिल्याने लोकांत समाधानाचे वातावरण असल्याची खात्री आ. जगताप यांनी चंद्रकांतदादा यांना दिली.
 पार्टी आ. जगतापांच्या पाठीशी
खा. संजयकाकांनी आ. जगताप यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत, ना. चंद्रकांतदादांनी भाजपा आणि सरकार आ. जगताप यांच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱया विधानसभेसाठी भाजपकडून आ. जगताप हेच उमेदवार असल्याचे संकेत देत त्यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाच्या आशाही त्यांनी आपल्या भाषणात पल्लवीत ठेवल्या. दादांच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी प्रचंड टाळयांच्या गजरात स्वागत केले.


No comments:

Post a Comment