Saturday, October 6, 2018

जत तहसीलसमोर‘मराठा स्वराज्य संघ’चा ठिय्या


जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्यावे. दुष्काळी तालुक्याला पिक विम्याचे पैसे अद्यापि आलेले नाहीत ते द्यावेत. टंचाईग्रस्त गावांना प्रशासनाने टँकरची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी राज्य मराठा स्वराज्य संघाच्या जत शाखेच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भारूड-कीर्तनातून विविध मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या.
मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बाजीराव चव्हाण, वसंत कदम, वसंतराव चव्हाण, रमेश शिंदे, बारीश शिंदे, मोहन माने पाटील, मच्छिंद्र बाबर आदींनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला होता. सुभाषराव गायकवाड म्हणाले, जत तालुका दुष्काळाशी दोन हात करीत आहे. गेल्या वर्षभरापासून तालुक्यात पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे सगळे तलाव कोरडे पडले असून म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून या तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्यायची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे. तालुक्यातील पंचवीस ते तीस गावात सध्या टँकरची मागणी असून प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत. तालुकाध्यक्ष बाजीराव चव्हाण म्हणाले, मराठा समाजाच्या अनेक मागण्या असून त्या मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात तातडीने आरक्षण मिळावे अशी आमची मागणी असून यासाठी यापुढेही आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

No comments:

Post a Comment