Sunday, October 14, 2018

माहूरगडाची रेणुका देवी


माहूरगडावरी गडावरी गं तुझा वास । भक्त येतील दर्शनास॥
माहूरगडावरील श्रीरेणुकामातेचे मंदिर लहान असले, तरी जगाला व्यापून राहिलेल्या या वत्सल माउलीचे रूप भव्य व सुंदर आहे. ती रत्नजडित सिंहासनावर विराजमान आहे. विशाल कपाळावर कुंकवाचा मळवट आहे. मुखात विडा रंगलेला आहे. मातेची पिवळी साडी शोभत असून, नानाविध रत्नांचे अलंकार तिच्या गळ्यात आहेत. मातेच्या या विशाल रूपाचा फक्त अर्धाच म्हणजे गळ्यापासून वरचा भाग असला, तरी विष्णुदासांसारख्या भक्तांना तिचे दर्शन होते. ही आदिमाता, विश्वजननी रेणुका या माहूरगडावर केव्हा आली, येथे कशासाठी स्थिरावली, हजारो भक्तांना हिचा वेध नित्य का वाटतो, अनेक नावांनी हिचे स्मरण का केले जाते... ही रेणुका परशुरामाची जननी आणि जमदग्नींची पत्नी आहे. एकवीरा आहे. महामाया, शिवा, महादीप्ती, सिद्धा, विद्या, योगिनी, कामदा, चंद्रिका, स्मिता, योगनिद्रा, प्रभावती, महावीरा, चतुर्भूजा, नादप्रिया, यक्षरा, अमृता, शूरा, रेणुतनया, माहेश्वरी, धनदा, लोपामुद्रा, शची, कालिका, तारा, अष्टभूजा, आदिती या नावांनी ओळखली जाते. ही जगन्माता अमर्याद आहे. अर्थात जिला मर्यादा नाही अशी ती अदिती आहे. याच देवीचा आधार आकाशाला भक्तांना आहे. ही देवी पृथ्वीला धारण करते.
तेजाच्या प्राप्तीसाठी हिचीच प्रार्थना करतात. विपत्ती, अपराध, पापे यांपासून मुक्ती मिळते. रेणुकेचा जन्म ः जगत् कल्याणासाठी भगवान शंकराने आदितीला आशीर्वाद दिला. आदितीच्या पोटी श्रीविष्णू जन्म घेतील आणि दैत्यांचा नाश करतील. पुढे हीच अदिती भागीरथी नदीच्या तीरावरील कान्यकुब्ज या नावाच्या नगरातील राजा इक्ष्वाकु याचा मुलगा रेणु असून, रेणुची कन्या रूपात अदिती जन्म घेते. राजा रेणु हा सद्गुणी व धर्मप्रवण होता. त्याने कन्याप्राप्तीसाठी शंकराची उपासना केली आणि आशीर्वाद मिळवून यज्ञ आरंभिला. यज्ञातून अतिशय रुपवती, दिव्य वस्त्र परिधान केलेली, कल्याणमुखी अशी कन्या अवतीर्ण झाली. ती कन्या अदिती आहे हे बघून देवांनी व ॠषींनी पुष्पांचा वर्षाव केला. पुढे रेणु राजाची ही अग्निजा कन्यारेणुकाया नावाने वाढू लागली. गड व रेणुका - कामधेनुचा रक्षणात रेणुकेचे पती जमदग्नींचा वध राजा कार्तवीर्यकडून झाला. त्यानंतर कामधेनु कष्टी मनाने स्वर्गलोकात निघून गेली. रेणुका, जमदग्नी यांच्यासोबत सती गेली; परंतु परशुरामाला कबूल केल्याप्रमाणे रेणुकादेवी जगन्मातेच्या स्वरूपात त्रैलोक्याचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीचा भेद करून शिखरावर आली.
परंपरा असे सांगते की, चितेस अग्नी दिल्यानंतर परशुरामाने मागे वळून पाहू नये, असे रेणुकेने सुचविले; पण मातेला बघण्यासाठी परशुरामाने मागे पाहिले व त्याला आपली माता अधिक तेजस्वी रूपाने वर येताना दिसली; परंतु परशुरामाने जसे मागे पाहिले, तशी देवी जितकी वर आली तिथेच थांबली. म्हणून श्रीरेणुका गळ्यापासून वरच्या भागापर्यंत गडावर स्थिरावली. पूजा व महत्त्व - माहूरगडावरील रेणुकामाता ही अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. विशेष प्रसंगी कुटुंबे मातेच्या दर्शनास येतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्री पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, आश्विन मासातील नवरात्र, कार्तिकी पौर्णिमा, दत्तजयंती, पौष शुद्ध अष्टमी, पौष वद्य एकादशी, चंद्र-सूर्याची ग्रहणे अशा विविध प्रसंगी माहूरगडाचा परिसर भक्तांनी गजबजून जातो. नवरात्रात देवीला विविध अलंकारांनी सजवतात. काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, भांगटिका, कर्णफूल, बोरमाळ, गरसोळी, नथ असे अनेक दागिने शोभून दिसतात.
 अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना करूनी हो । अशा प्रकारे घटस्थापना होते. द्वितीयेस चौसष्ट योगिनी जमल्यावर मातेची पूजा करतात. अष्टमीला पूजापाठ, मंत्रजागर, आरत्या, अष्टके, हवन यांनी परिसर गजबजून जातो. दशमीला मातासीमोल्लंघनासनिघते. सर्वत्र निशाणे व पताका फडकतात. परशुरामाची पूजा होते. देवीची मूर्ती पालखीत घालून नरनारायण टेकडीपर्यंत मिरवत नेतात. रेणुकेच्या महाद्वाराजवळ नगारखान्याच्या उजव्या बाजूला शेंदूर लावलेली देवी महाकाली आहे. हिला अग्रपूजेचा मान असून; खण, नारळ, खारका, तांदूळ, करंज्यापात्यांचा फुलोरा मातेस अर्पण करतेवेळी हिची आठवण ठेवणे आवश्यक आहे. रेणुकेला सणावाराला पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवितात. तांबड्या रंगाची फुले वाहतात. ज्वारी व मूग यांच्या पिठाचा तेलपानगा असून, जेवण झाल्यावर 25 पासून 500 पानांचा विडा देवीच्या तोंडातील तांबूलप्रसाद म्हणून घेतात. घरात एखादे मंगलकार्य झाले, की देवीच्या प्रीत्यर्थ गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
 रूप सुंदर सुंदर । ध्यानी योगी दिगंबर ॥ रत्नजडित सिंहासनी । शोभे सिंहाद्विवासिनी । दिसे मळवट चांगला । मुखी तांबुल रंगला ॥ रूप सुंदर सुंदर । ध्यानी योगी दिगंबर॥ माहूरगडावरील जगन्मातेच्या मंदिरात मातेला पाहताच गड चढल्याचा शीण क्षणात संपतो. सतत प्रसन्न असणारी, तसेच साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ असलेली जगन्माता भेटताच भक्तांचे देहभान हरपते.No comments:

Post a Comment