Wednesday, October 3, 2018

जन्मदात्या बापानेच केला मुलीचा खून

खिलारवाडीतील घटना;नात्यातील मुलाबरोबर प्रेमसंबंध
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील खिलारवाडी येथे मंगळवारी रात्री जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून व मारहाण करून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सुप्रिया सुऱ्याबा लोखंडे (वय-18) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सुऱ्याबा बाबू लोखंडे (वय 45) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणात फिर्याद तरूणीचा चुलत भाऊ जगन्नाथ बाळासाहेब लोखंडे याने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रिया ही नात्याने चुलत भाऊ असलेल्या जगन्नाथ लोखंडे यांच्याशी फोनवरून वारंवार बोलत होती. हे बोलणे सुप्रियाच्या वडिलांना पसंद नव्हते. त्यामुळे अलिकडे यावरून दोघांमध्ये वाद होत होते. त्याचबरोबर फिर्यादी जगन्नाथ याच्याशी सुर्याबा याचे भांडण झाले होते. मंगळवारी असाच प्रकार घडल्याने संतापलेल्या बापाने सुप्रियाचा गळा आवळून व मारहाण करून खून केला.

याप्रकरणी फिर्याद जगन्नाथ लोखंडे याने दिली आहे.त्याने फिर्यादीत म्हटले आहे की, मी सुप्रियाशी फोनवरून बोलत होतो,मात्र आमच्यात कसलेच वाईट संबंध नव्हते.सुप्रियाच्या मदतीने एका मुलीला लग्नाची मागणी घालण्याचा प्रयत्न सुरू होता. सुप्रियाने त्या मुलीशी गाठ घालून दिली होती.पण नंतर ती मुलगी माझ्याशी बोलायची बंद झाली. त्यामुळे मी सुप्रियाला मध्यस्थी करण्याविषयी विनवणी करत होतो.त्यामुळे सुप्रियाला फोन करून विचारणा करत होतो. परंतु सुप्रियाच्या वडिलांनी अनैतिक संबंधाच्या संशयावरून याच कारणाने मागच्या 20 सप्टेंबर रोजी माझ्याशी भांडण काढले होते. यावेळीही वाद झाला होता.
यानंतर सुप्रियाचे कुटुंब  2 ऑक्टोबर रोजी गाव सोडून गोव्याला कामाला निघाले होते.  ही गोष्ट मला सुप्रियाने फोनवरून सांगितली. मी मंगळवारी काळीपिवळी गाडी घेऊन त्यांना आणण्यासाठी व हा वाद मिटवण्यासाठी गुगवाड फाट्यापर्यंत गेलो. तिथे तिच्या आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली. लोक जमू लागल्याने  मी तिथून निघून आलो.
या प्रकरणानंतर मयत सुप्रिया,तिची आई व वडील सुर्याबा हे सगळे पुन्हा खिलारवाडी येथे आपल्या वस्तीवरील घरी आले. याठिकाणी पुन्हा बाप-लेकीत वाद झाला. रागाच्या भरात बापाने मारहाण करून सुप्रियाचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर प्रकरण मिटवून रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केले जाणार होते,मात्र जगन्नाथने पोलिसांना कळविल्याने हा बेत रद्द करण्यात आला.
दरम्यान,पोलीसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून वडील सुर्याबा यास ताब्यात घेतले. आज सकाळी मृतदेहाचे शवविछेदन करून सकाळी अकरा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नंतर गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.वडिलावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जगन्नाथ यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत सुप्रियाच्या आईदेखील फिर्याद देणार होती.रात्री उशीरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.

No comments:

Post a Comment