Sunday, November 11, 2018

मोबाईल दुरुस्तीसाठी ग्राहकांची होतेय लुबाडणूक


जत,(प्रतिनिधी)-
आज प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या हातात भ्रमणध्वनी आहे. गोरगरिबांपर्यंतही भ्रमणध्वनीचे मोबाईल)लोण पसरले आहे. पण घेतलेल्या भ्रमणध्वनीत बिघाड झाल्यास दुरुस्तीचा खर्च खरेदी किंमतीपेक्षा जास्त होत असल्याने भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहेत. काही दुकानदार किरकोळ दुरुस्ती असली तरी अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करून लुबाडणूक करताना दिसतात.
कुणाशीही, कुठेही त्वरित संपर्क साधण्याचे माध्यम भ्रमणध्वनी आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असला पाहिजे हे शासकीय धोरण व मोबाईल कंपन्यांची स्पर्धा यामुळे गोरगरीब वस्त्यांपर्यंत मोबाईल पोहोचला आहे. मोबाईल घेणे स्वस्त असले तरी त्याची दुरुस्ती म्हणजे एक आण्याची मुर्गी व तीन आण्याचा मसाला या म्हणीप्रमाणे गत झाली आहे. त्यात आज बेरोजगारीने युवक वर्ग हैराण आहे. पदवीधर युवक रोजगाराच्या शोधात फिरत आहे. तालुक्यात गल्ली बोळात मोबाईल दुरुस्तीचे दुकान दिसू लागले आहे. त्यातील काहींनी भ्रमणध्वनी ग्राहकांची विश्वासाहर्ता प्राप्त केली असून ग्राहक आपला मोबाईल बिघडल्यास त्यांचेकडे डोळे झाकून दुरुस्तीला टाकतो. परंतु काही युवकांनी फक्त मोबाईलधारकांची लूट करण्यासाठीच मोबाईल दुरुस्तीची दुकाने थाटली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तंटे वाढत आहे.
हातगाडीवर भाजी विकणारा, ऑटोचालक अथवा कामगार असो जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे. बर्याचदा मोबाईल हाताळताना खाली पडणे, पाण्यात पडणे, धूळ जाणे, स्पिकर फाटणे तथा अन्य समस्या निर्माण होतात. मोबाईल नादुरुस्त झाल्यास लगेच मोबाईल घेणे शक्य होत नाही. त्यामुळे दुरुस्ती हाच पर्याय ग्राहकांसमोर असतो. काही दुकानदार तर दुसरीकडे दुरुस्तीला टाकून आपले कमिशन ग्राहकांकडून वसूल करतात. ग्राहकाला यातील ज्ञान शून्य असल्याने त्याची लुटमार सहज शक्य असते.
मोबाईलमध्ये पाणी जाऊन तो बंद पडला तरी त्याच्या दुरुस्तीसाठी 400 ते 500रुपये काही दुकानदार वसूल करतात. वास्तविक अनेकदा किरकोळ स्वरूपात मोबाईलमध्ये पाणी गेले असले तरी मोबाईलची बॅटरी काढून ती सुकविण्यासाठी इतर पार्ट उघडे करुन त्याला ड्रायरने सुकविले जाते. यासाठी विशेष खर्च येत नसला तरी काही दुकानदार 400ते 500रुपये ग्राहकांकडून घेतात. या व्यतिरिक्त मोठी दुरुस्ती असल्यास विचारायलाच नको. परिणामी अनेकदा मोबाईलच्या किंमतीपेक्षा दुरुस्तीचा जास्त खर्च येतो. त्यासाठी असली (ओरिजिनल)पार्ट बसविण्याची शक्यताही कमी असते. या मोबाईल दुकानदारांवर कायद्याचा वचक कसा बसणार असा सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment