Sunday, November 11, 2018

वेदनाशामक गोळ्या ठरू शकतात वेदनादायी


मूत्रपिंडावर परिणाम;मूतखड्याचेही आजार वाढले
जत,(प्रतिनिधी)-
जरा अंग दुखले की घ्या लगेच पेनकिलर म्हणजे वेदनाशामक औषध... असे आपल्यापैकी बरेचजण सहजपणे करतात.पण त्यामुळे अंगदुखी पळत असली तरी त्याचा थेट परिणाम तुमच्या मूत्रपिंडावर होत असतो. आणि त्यामुळे तुम्हाला गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते... देशाला मूत्रपिंडाच्या आजाराचा विळखा पडल्याचे नेफेप्लस संस्थेने देशात केलेल्या पाहणीत आढळले आहे. चिकण गुणिया, मूत्रपिंडात खडे यासह अंगदुखीचा त्रास अलिकडच्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात वाढू लागला आहे.
स्नायूदुखीचा थोडा त्रास झाला तरी सर्रास वेदनाशामक औषधे घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आणि तीच स्थिती त्यांना रोगाकडे ओढून नेऊ शकते.बहुतांश रुग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर दुकानात जाऊन वेदनाशामक औषधे घेतात. त्याचा सर्वाधिक परिणाम मूत्रपिंडावर होतो.त्यामुळे तरुणांमध्ये मूत्रपिंडाचा विकार वाढत आहे. मूत्रपिंडाचा विकार झालेल्यांपैकी फक्त 10 टक्के रुग्ण नियमित औषधोपचार घेतात.रुग्णाचे डायलिसिस पुढे ढकलणे हे महत्त्वाचे असते. पण या उपचारात रुग्णांकडून सातत्य राहत नाही किंवा त्याचा खर्च परवडत नाही. मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण रुग्णांमध्ये मूत्रपिंडाच्या विकाराच्या रुग्णांचे प्रमाण 30 टक्के आहे. तसेच देशात मधुमेह असलेल्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे.मधुमेहाचा थेट परिणाम मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर होतो.त्यातून हे विकार वाढतात.
अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब रोखणे आवश्यक ठरते.त्याकडे दुर्लक्ष केल्याने मूत्रपिंडाचे विकार वाढतात. आतापर्यंत मूत्रपिंडाचे विकार वयाच्या पन्नाशीनंतर रुग्णांमध्ये आढळत होते.पण,आता ते वयाच्या तिशी-पस्तीशीत होतात. मधुमेह लवकर होत असल्याने मूत्रपिंड विकाराचे वयदेखील कमी झाले आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या विकाराचे प्रमाण अधिक आहे.
अलिकडे चिकणगुणियासारखे आजार सर्वसामान्य झाले आहेत. यात साम्धे, स्नायू दुखतात. याला पेन किलरच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय राहत नाही. किमान चार-दोन दिवसांत एकदा एकादी गोळी खावावीच लागते. त्याचबरोबर मूतखड्याचा त्रासही लोकांमध्ये वाढत आहे. यासाठीही डॉक्टरांचा सल्ला न घेता लोक वेदनाशामक गोळ्या घेताना दिसतात. मात्र याचा अतिरेक झाल्यास त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment