Friday, November 16, 2018

वातावरणातील बदलामुळे आजारात वाढ

जत,(प्रतिनिधी)-
यंदा पाऊस कमी झाल्याने दिवाळीत बर्‍यापैकी राहणार्‍या थंडीने आता अचानक जोर काढला असल्याने एकदम वातावरणात झालेल्या बदलाचा विपरित परिणाम आरोग्यावर होत असल्याने जत परिसरात सर्दी, खोकला, दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याने दवाखाने फुल्ल दिसत आहे.
कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा एकदोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे दिसून येते. आता दोनतीन दिवसांत रात्रीच्या तापमानात बराच फरक पडत आहे. आपल्याकडे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना लहान उन्हाळा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या महिन्यात दिवसा कडक ऊन असते तर नोव्हेंबर लागताच रात्रीच्या किमान तपमानात घट होऊ लागते. साधारणत: दिवाळीपासून आपल्याकडे थंडीची चाहूल लागते. दोन दिवसांपासून आकाश निरभ्र झाल्याने दिवसाच्या तापमानात वाढ तर रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे. त्यामुळे दिवसा कडक उन्ह तर रात्रीला बोचरी थंडी असे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे.
वातावरणामुळे सर्दी, पडसे, ताप व खोकल्याच्या आजारात वाढ झाल्याचे दिसून येते. डिसेंबरमध्ये जम्मू-काश्मीर व उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणात हिमवर्षाव होत असतो. उत्तर भारतातून दक्षिणेकडे येणार्‍या थंड वार्‍यामुळे थंडीचे प्रमाण अधिक असते. गेल्या आठवड्यात ढगाळी वातावरण होते. लगेच दोन दिवसांत आकाश निरभ्र झाले. या हवामानातील बदलामुळे सर्दी, थंडी वाजून ताप येणे, खोकला, डोके दुखणे, अंग दुखणे आदी आजारांत वाढ झाली आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम वृद्ध आणि लहान मुलांवर लगेच होतो. दमा असलेल्या रुग्णांना थंडीचा अधिक त्रास होत आहे.

No comments:

Post a Comment