Thursday, November 22, 2018

माडग्याळवासियांची तहान विकतच्या पाण्यावर


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सुमारे दहा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या माडग्याळ गावाला याही हंगामात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने पाण्याच्या टँकरला खोडा घातल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
दरवर्षी माडग्याळ गावाला पिण्याच्या पानी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही तालुक्यात पाऊस झाला नसल्याने ऐन पावसाळ्यातच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी नळयोजना अपुरी पडत असून कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न होत नसल्याने लोकांना पाण्यासाठी रोजच धावाधाव करावी लागत आहे. सध्या प्रशासनाने गाव आणि वाड्यावस्त्यांवरील लोकांसाठी आठ कुपनलिकांचे अधिग्रहण केले आहे. पण हेही पाणी अपुरे पडत आहे.
गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत असताना प्रशासन मात्र पाण्याचा टँकर द्यायला तयार नाही. त्यामुळे लोकांना विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका बसत असून घरपट्टी,पाणीपट्टी ग्रामपंचायतीला भरत असताना आम्हाला आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत व शासनाने आम्हाला पाणी व घरपट्टीमध्ये सवलत द्यावी व गावाला टँक़रने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment