Saturday, November 10, 2018

उमदी येथील वीज कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमदी आणि परिसरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याला कंटाळून उमदी ग्रामस्थांनी राज्य वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उमदी येथे एजी फीडर आहे. या फीडरवर कमी-जास्त  दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वारंवार उमदी येथे वीज पुरवठा खंडित होत आहे. या संदर्भात गेले अनेक महिने सहाय्यक अभियंता उमदी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. वारंवार दिवे ट्रीप होत असल्याने या फीडरवर असणार्या शेतकर्यांच्या मोटारी जळत आहेत. शिवाय या फीडरवर उमदी गावही असल्याने ग्रामस्थांच्या घरातील वीज उपकरणे जळण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा नाहक आर्थिक भुर्दंड ग्राहकांना बसत आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने थोड्या फार पाण्यावर जगवलेल्या द्राक्ष व डाळिंब बागा संकटात सापडल्या आहेत.त्यांच्या कुपनलिकांना थोडे थोडे पाणी आहे. त्यातच विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थ आणि शेतकर्यांनी उमदी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळा ठोकण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर निवृत्ती शिंदे, अनिल शिंदे, बंडा शेवाळे आदींसह शेतकर्यांच्या सह्या आहेत.
No comments:

Post a Comment