Tuesday, November 13, 2018

कला,क्रीडा शिक्षक भरतीसाठी शिक्षक भारती लढा देणार: महेश शरनाथे


जत,(प्रतिनिधी)-
शिक्षकांची कमतरता, अशैक्षणिक कामांचे ओझे,ऑनलाइनची कामे अशा अनेक समस्यांनी सध्या प्राथमिक शिक्षण घेरले आहे. आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा फक्त अभ्यास न पाहता त्याला आणखीही अॅक्टिव्हिटीज येण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी उद्या स्वत:च्या पायावर उभा राहायचा असेल तर त्याला प्राथमिक स्थळावरच सर्व प्रकारचे शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. पण कला,क्रीडा, कार्यानुभव या महत्त्वाच्या विषयांकडेच सध्याला दुर्लक्ष होत आहे. प्राथमिक शाळांमध्ये अशा शिक्षकांची भरती करण्यासाठी शिक्षक भारती शासनाशी लढा देणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. 
राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात कला,क्रीडा शिक्षकांची आवश्यकता विशद केली आहे. शालेय जीवनात कला, क्रीडा व कार्यानुभव विषयाची एवढी मोठी गरज असताना राज्य सरकारने मात्र उलटी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. शिक्षक संचमान्यतेतून कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना वगळले आहे. प्रश्न कला, क्रीडा शिक्षकांच्या नोकरीचा नाही. ज्या विषयाची आवड विद्यार्थ्यांना आहे, ज्या विषयाची गरज विद्यार्थ्यांना आहे, तेच विषय वगळले तर सुदृढ आणि सक्षम पिढी निर्माण कशी होणार? शाळा चार भिंतींचे कोंडवाडे नाही होणार का? अशा कोंडवाड्यात शिक्षण कसे होणार? केवळ शिक्षणावरचा खर्च कमी करण्यासाठी मुलांचे भविष्यच सरकार अंधारात लोटत आहे. काही मुला- मुलींसाठी तर शाळेचे क्रीडांगण ही एकमेव हक्काची खेळण्याची जागा आहे. मुलींना मैदानात जाऊन खेळू दिले जात नाही.
   शालेय शिक्षणात कला ही कशासाठी कसे जगायचे हे शिकवते. शाळेत प्रवेश करताच शाळेचे रुप बदलले दिसते ते केवळ कला शिक्षकामुळे.  कला शिक्षकांचा केवळ चित्रकारच नाहीतर अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर्स घडविण्यात फार मोठा वाटा असतो. कला शिक्षकांमुळे शाळा जिवंत वाटते. संगीत, कला, कार्यानुभव हे विषय शाळेचे प्राण आहेत. परंतु याही शिक्षकांना शासनाने आता संचमान्यतेद्वारे  बाहेर काढलेले आहे. जवळपास तीस टक्के पदे रद्द केली आहेत. रिक्त पदे जवळपास 50 हजार आहेत.  
शाळेला शिस्त क्रीडा शिक्षकांमुळे येते.करडया तरीही स्नेहपूर्ण वातावरणात विविध खेळांचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षक देत असतो. किमान 250 विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक असायलाच हवा असा शासनाचा जीआर सांगतो. शाळा तिथे कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षक असणे गरजेचे आहे. आरटीई कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेत शासनाने या शिक्षकांना शाळेतुन हद्दपार केले आहे. 5000 रुपये मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमण्याची अतिथि निदेशक नेमले. 100 विद्यार्थ्यांमागे अर्धवेळ शिक्षक यांचा अर्थ. 200 विद्यार्थ्यांमागे एक पूर्णवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक शाळेला द्यायला हवा होता. ते कायद्याने बंधनकारक असताना त्या सर्व शिक्षकांना अर्धवेळ करून त्यांना पाच हजार रुपये नाममात्र मानधनावर शाळेमध्ये तात्पूर्ती नियुक्ती देण्यात आली. तीन वर्षांनंतर त्यांनाही शाळेतून काढून टाका असेही सांगण्यात आले आहे. कला, क्रीडा, कार्यानुभव विषयाची गरज आहे. कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या शिक्षकांना संच मान्यतेत घेण्यात  यावे. त्यांची भरती करावी, त्यांना विशेष शिक्षकांचा दर्जा बहाल करण्यात यावा.
 अतिथी निदेशकांना पूर्णवेळ करून त्यांना शिक्षकांचे वेतन सुरू करावे. या लढाईसाठी आता कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा महेश शरनाथे यांनी दिला आहे.यावेळी आमदार कपील पाटील, संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, जालिंदर सरोदे, नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारू, असेही शरनाथे यांनी सांगितले यावेळी कृष्णा पोळ,दिगंबर सावंत, कादर आत्तार, उदयकुमार रकटे, दिपक काळे, दादासो महाडीक, दादा खोत, संजय कवठेकर, चंद्रशेखर क्षीरसागर, चंद्रकांत भोसले, बिरु मुढे यांसह शिक्षक भारती पदाधिकारी,कार्यकर्ते  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment