Friday, November 30, 2018

विवाहितेच्या शरीरात सोडले एचआयव्हीचे विषाणू


पुणे,(प्रतिनिधी)-
हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून घटस्फोट देण्यासाठी तिच्या शरीरात डॉक्टर पतीने चक्क एचआयव्ही या जीवघेण्या आजाराचे विषाणू सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचा पती होमिपॅथिक डॉक्टर असून काळेवाडीतील एका नामांकित रुग्णालयात कामाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मे 2015 मध्ये विवाह झाला. त्यानंतर विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा विवाहितेकडे लावला. सुरुवातीला विवाहितेने माहेरहून काही पैसे आणले. मात्र सासरच्या मंडळींनी आणखी पैशांची मागणी केली. वारंवार वाढत जाणार्या पैशांच्या मागणीपुढे हतबल होऊन विवाहितेने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे पती, सासू, सासरा यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत घटस्फोटासाठी तगादा लावला. काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला आजारी होती, त्यावेळी तिच्या सलाईनमध्ये एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आले. यातून विवाहित महिलेला एचआयव्हीची बाधा झाली. याप्रकरणी फौजदार संगीता गोडे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment