Tuesday, November 6, 2018

फटाक्यांचा आवाज झाला कमी

 दुष्काळ आणि निर्बंधाचा परिणाम
जत, ( प्रतिनिधी)-
दिवाळीत फक्त रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके उडवावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने आणि सणावर दुष्काळाचे सावट असल्याने शहर आणि तालुक्यात फटाक्यांचा आवाज गतवर्षांपेक्षा कमीच दिसून येत आहे.

सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी न्यायालयाच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी संबंधित सर्व यंत्रणांनी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा परिणाम जाणवत आहेच, पण यावर्षी पावसअभावी पडलेल्या दुष्काळाचा परिणामही जाणवत आहे.त्यामुळे फटाके कमीच फुटत आहेत. मार्केट यार्डात फटाक्यांचे स्टॉल लागलेले आहेत.येथील व्यापाऱ्यांना याबाबत विचारले असताना त्यांनी सांगितले की, यंदा फटाक्यांना फारशी मागणी नाही.
यंदा विविध मार्गातून फटाके फोडण्याला आळा घालण्यात प्रशासनाला यश आले आहे.  विद्यार्थ्यांनी फटाके विकत घेऊ नयेत आणि ते वापरू नयेत याबाबत शिक्षकांनी जास्तीत- जास्त प्रबोधन करावे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी यांनी फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधन करून फटाक्यांचा वापर न करण्याबाबत किंवा कमी करण्याबाबत जनजागृती करावी. दिवाळी किंवा इतर सणांवेळी   रात्री 8 ते 10 च्या दरम्यानच फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले होते.याचाही परिणाम दिसून येत आहे.
नुकतीच जिल्हाधिकारी श्री. काळम पाटील यांनी सांगलीत बैठक घेऊन याबाबत मार्गदर्शन केले होते. यावेळी ख्रिसमस व नवीन वर्षावेळी  फटाक्यांचा वापर रात्री 11.55 ते रात्री 12.30 या दरम्यानच व्हावा. संबंधित पोलिस स्थानकाच्या अधिकार्‍यांनी फटाके या नेमून दिलेल्या वेळेतच वाजविले जातील याबाबत दक्षता घ्यावी. शिवाय प्रतिबंधित फटाक्यांची विक्री होणार नाही याचीही खात्री करावी,  अशाही सूचना दिल्या होत्या. कोणत्याही प्रकारे आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशाचे  उल्लंघन हा न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीपूर्वी सात दिवस व दिवाळी नंतर सात दिवस असे एकूण 14 दिवस फटाक्यांच्या दुष्परिणामाच्या अनुषंगाने हवेची गुणवत्ता तपासावी, असे आदेशही यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.
यंदा जत तालुक्यात कमालीचा दुष्काळ पडला आहे. याचा परिणाम दिवाळी सणावर दिसत आहे.फरालापासून कपड्यांपर्यंत सर्वच क्षेत्रात उठाव कमी झाला आहे.त्यातच महागाईने उचल खाल्ली असून अन्नधान्य आणि कडधान्ये महागली आहेत.ज्वारी एक हजार तर बाजरी 250 ते  500 रुपयाने महागली आहे.

No comments:

Post a Comment