Sunday, November 11, 2018

’ब’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे येतोय थकवा


डॉक्टरांचे प्राथमिक निदान;दूध,दूग्धजन्य पदार्थ वाढवण्याचा सल्ला
जत,(प्रतिनिधी)-
तुम्हाला उत्साह वाटत नाही,लवकर थकवा येतो,या प्रश्नाचे उत्तर हो असल्यास तुमच्या शरीरात ब जीवनसत्त्वाची कमी आहे, असे समजावे. अलिकडच्या काही दिवसांत रुग्णांमध्ये ब जीवनसत्त्वाचा अभाव असल्याचे आढळून येत आहे. यासाठी जेवणात सकस आहार असावा, असा आग्रह डॉक्टरांकडून होत आहे.
मांसाहारापासून सहजपणे ब जीवनसत्त्व मिळते;पण शाकाहारी मंडळींनी भाजी-चपाती,वरण-भात याबरोबरच आपल्या आहारात दूध आणि दूग्धजन्य पदार्थ वाढवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.दवाखान्यात येणार्या बहुतांश रुग्णांना ब जीवनसत्त्वाचा तुटवडा असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. कार्यालयात काम करताना उत्साह न वाटणे किंवा दोन-चार तास काम केल्यावर खूप थकवा जाणवणे अशा तक्रारी 25 ते 55 या वयोगटातील रुग्ण सध्या घेऊन येत आहेत.ब जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असल्याची ही प्रमुख लक्षणे आहेत. त्यामुळे या जीवनसत्त्वाची चाचणी करण्याचा सल्लाही दिला जातो आणि त्यातील बहुतांश रुग्णांमध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असल्याचेही वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालावरून स्पष्ट होते, अशी माहिती शहरातील डॉक्टरांनी दिली.
शरीराला मांसाहारातून ब जीवनसत्त्व मिळते.त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये या जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असते.त्याचा थेट परिणाम रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर होतो.त्यामुळे तरुण वयात येणार्या हृदयविकाराच्या किंवा अर्धांगवायूच्या झटक्यामागील अनेकपैकी एक कारण या जीवनसत्त्वाची कमतरता हे असते. अल्कोहोल,सिगारेट,तंबाकू यामुळे शरीरातील ब जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात शोषून घेतले जाते.त्यामुले व्यसनाधिन लोकांमध्ये हे जीवनसत्त्व कमी असल्याचे दिसते.मेंदूच्या क्रियेशी या जीवनसत्त्वाचा संबंध असतो.
ब जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे निदान झाल्यास त्याचे प्रमाण वैद्यकीय चाचण्यांमधून निश्चित समजते.पण काही रुग्णांना ही वैद्यकीय चाचणी परवडत नाही, त्यांना निदानाच्या आधारावर ब जीवनसत्त्वाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन देते येते, असेही डॉक्टरांनी सांगितले.दूध आणि दूधाचे पदार्थ आहारात पुरेशा प्रमाणात घेतल्यास शाकाहारी माणसांमध्येही चुकूनही ब जीवनसत्त्वाची कमतरता होत नाही. आपल्या आतडीमध्ये असलेले काही जीवाणूदेखील हे जीवनसत्त्व निर्माण करत असतात.काही डॉक्टरांच्यामते पाश्चिमात्यांच्या तुलनेत भारतीयांमधील ब जीवनसत्त्वाचे प्रमाण हे कमीच आहे. योग्य आणि चौरस आहारातून या जीवनसत्त्वाच्या प्रमाणात समतोल ठेवता येतो.

No comments:

Post a Comment