Friday, November 9, 2018

ऑनलाइन खरेदीचा व्यावसायिकांना फटका

व्हरायटी आणि सवलतीच्या वर्षांवाचा परिणाम; वेळेची बचत,कॅशऑन डिलिव्हरीची सोय
जत,(प्रतिनिधी)-
अलिकडच्या काही वर्षात ऑनलाईन वस्तू खरेदीचा जोर वाढला आहे. त्यातच सण-उत्सव असतील तर ऑफरची बरसात होत असल्याने ग्राहकांची, विशेषत: तरुण वर्गाची पसंदी या ऑनलाईनलाच मिळत आहे. साहजिकच स्थानिक व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. ग्रामीण भागातही ऑनलाईनची चलती सुरू आहे.
मोबाईल,टीव्ही, लॅपटॉपसह छोटे-मोठे अनेक डिव्हाईस मोठ्या प्रमाणात आणि सवलतीत ऑनलाईन उपलब्ध होत आहेत.साड्या, ड्रेससह अन्य कपडेही ऑनलाईन मिळू लागली आहेत. याशिवाय औषधे,चेहरा, अंगावरील जखमांसाठीचे क्रिम्स, अन्य सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या विविध वस्तू आता ऑनलाईन बाजारात उपलब्ध होत असल्याने ग्राहक आता स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन बाजाराकडे वळला आहे. मुळात म्हणजे अशा प्रकारची खरेदी करण्यासाठी लोकांना बाहेर कुठे जावे लागत नाही. घरबसल्या मोबाईलवर विविध मालाच्या व्हरायटी पाहायला मिळत असल्याने घरी बसून आरामात वस्तूंची निवड करता येत असल्याने लोकांनी अशा खरेदीलाच अधिक पसंदी दिली जात आहे.
ऑनलाईन शॉपिंग साईट्स वाढल्या आहेत. याशिवाय काही कंपन्या स्वतंत्रपणे ऑनलाईन विक्रीच्या सोयी उपलब्ध करून ठेवत आहेत. त्यामुळे हव्या त्या कंपन्यांचा माल आपल्याला सोयीस्कररित्या मिळत राहतो. यासाठी गर्दीत, ताटकळत उभे राहावे लागत नाही. हा शॉपिंगचा वेळ आणखी कुठे तरी घालवायला मिळतो. ज्यांना शॉपिंगचा कंटाळा येतो,त्यांच्यासाठी तर ही ऑनलाईन खरेदी पर्वणीच ठरत आहे. बाजारापेक्षा स्वस्तात वस्तू मिळत असल्याने लोकांची पसंदी वाढत आहे.
सणासुदीला या ऑनलाईन कंपन्या मोठ्या प्रमाणात ऑफर्स देत आहेत. काही कंपन्यांनी तर काही वस्तूंवर पन्नास टक्क्यांहून अधिक सवलती दिल्या आहेत, देत आहेत. काही ग्राहक तर अशी ऑफर्स कधी मिळते, याची वाट पाहातच संबंधित साईट्सशी चिटकून असतात. बाजारापेक्षा कमी पैशांत वस्तू मिळत असेल तर लगेच खरेदी करून टाकली जाते. काहीजण तर यावरही स्वत:चा बिझनेस सुरू केला आहे. ऑनलाईन स्वस्तात मिळवलेल्या वस्तू थोडे मार्जिन ठेवून दुसर्‍यांना विकून नफा मिळवत आहेत.

No comments:

Post a Comment