Thursday, November 8, 2018

जत तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या उत्तरेस असलेल्या सिंगनहळ्ळी,जतरोड,गुळवंची-धावडवाडी परिसरात पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी जत तालुका विकास मंचच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात शासनाची पाचशे एकर व अन्य पडीक जमीन मिळून दीड हजार एकर जमीन उपलब्ध आहे. यातच धावडवाडी हे गाव गुहागर-जत- विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे, तर सिंगनहळ्ळी हे गाव जत-सांगोला-इंदापूर या राष्ट्रीय मार्गावर आहे. तसेच आता नवीन होत असलेल्या कोल्हापूर-सांगली-सोलापूर मार्गानजिक आहे. त्याचबरोबर जतरोड रेल्वे स्टेशन (वाळेखिंडी) हे ठिकाण मिरज-लातूर रेल्वे मार्गावर आहे. सध्या या रेल्वेमार्गाचे वेगाने विद्युतीकरण सुरू आहे. त्यामुळे  हा परिसर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) योग्य आहे. या परिसरात टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहचले असून कारखान्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकते. याशिवाय या परिसरात प्रतापपूर, कोसारी, वाळेखिंडी, शेगाव लघुप्रकल्प (तलाव) आहेत. हे तलाव या योजनेतून पाण्याने भरून घेतल्यास पाण्याची कमतरता भासणार नाही.
कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनजवळ दोनशे एकरांमध्ये होत असलेल्या ड्रायपोर्टपणपासून हा परिसर 12-15 किलोमीटर अंतरावर येतो. ऊर्जेसाठी अस्तित्त्वात असलेल्या अनेक पवन ऊर्जा प्रकल्पांचे या परिसरात मोठे जाळे आहे. शिवाय या परिसरात भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौर ऊर्जा प्रकल्पही उभारला जाऊ शकतो. यासाठीही संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जर पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिल्यास या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. या दुष्काळी तालुक्याचा विकास होईल. यासाठी सरकारने या परिसरात औद्योगिक वसाहत उभारून दुष्काळी भागाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.No comments:

Post a Comment