Monday, November 19, 2018

चारा निर्मितीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा- अजितकुमार पाटील

 जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पश्चिम भागात म्हैशाळचे पाणी आलेल्या गावांमध्ये शासकीय योजनेच्या लाभातून चारा निर्मिती करुन तो चारा तालुक्यातील उर्वरित पूर्व, पश्चिम व दक्षिण भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा,अशा  मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे व तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे दिले आहे.
      जत तालुक्यात १९७२ पेक्षाही भिषण दुष्काळ पडला आहे. वार्षिक सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. सध्या हिवाळा सुरू असून या हिवाळ्यातच उन्हाळा असल्याची जाणीव होत आहे. तालुक्यात नोव्हेंबर अखेर टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील 30 पेक्षा अधिक गावांत पहिल्या टप्प्यात टँकरची मागणी होत आहे.
   एकूणच जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडणार हे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने  तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावात म्हैशाळचे पाणी दाखल झाले आहे. तालुक्यातील चारा टंचाई दूर करण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री ना.महादेवरावजी जानकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत वैरण बियाणे वितरण योजना सन २०१८-१९ मधून वैरण बियाणे देणेबाबत ज्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरती विहीर अथवा बोअरची नोंद आहे,अशा  शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी दहा गुंठे ते एक हेक्टर पर्यंत मोफत मका व ज्वारी बियाणे देणेचा निर्णय करण्यात आला आहे. एक हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला बियाणे सोबत दोन हजार 300 रुपये खतासाठी थेट अनुदान खात्यावरती जमा होणार आहे. जर या योजनेची जनजागृती केली तर मोठ्या प्रमाणात चारा निर्मिती करून जत तालुक्यातील पूर्व दक्षिण उत्तर भागातील चाऱ्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. शासनाने जर थेट अनुदान द्यायचे धोरण अवलंबले तर त्या पशुपालकाला जवळच्या जवळ कमी दरात सहज चारा उपलब्ध होऊ शकतो. यासाठी पश्चिम भागात दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चारा लागवडीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी.
   शासनाने तलाव क्षेत्रातील जमीनी चारा निर्मितीसाठी भाडे तत्वावर देण्याचे नियोजन केले आहे. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी. त्याबाबत जनजागृती प्रशासनाने हाती घ्यावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment