Friday, November 9, 2018

देशपांडे वडा: जतचा ब्रँड

जत,(प्रतिनिधी)-
कुठलाही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. फक्त तो करण्याची जिद्द आणि कष्ट तुमच्याजवळ असायला हवे. या जिद्दीतून तुम्ही तुमचे स्वप्न तर साकार करू शकालच,पण तुम्ही या जगात स्वावलंबनाने आणि ताठ मानाने जगू शकाल. चांगले अर्थाजन करून देणारे अनेक व्यवसाय आपल्या आजूबाजूला आहेत. पण त्यात आपला जीव ओतला की, तुम्ही यशस्वी होता. असाच यशस्वी व्यवसाय करून दाखवण्याची किमया अनिल देशपांडे यांनी करून दाखवली आहे. आज त्यांचा देशपांडे वडा जत शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात एक ब्रँड बनला आहे. त्यांचा हा प्रवास इतरांनादेखील प्रेरणादायी आहे.
जत शहरात काही लोकांच्या नावाने काही पदार्थ विकले जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर पांडू भजीचे देता येईल. गेली पन्नास वर्षे ही पांडू भजी जत शहरात फेमस आहे. आज या भजी प्लेटचा दर 20 रुपये आहे,पण तरीही ही भजीने खायला लोक दूर दूरून येत असतात. तशीच ओळख देशपांडे वडापावची बनली आहे. शिवाजी पेठेतल्या एका कोपर्यात संध्याकाळी केवळ साडेतीन ते चार तास हा वडापावचा गाडा चालवला जातो,पण या कालावधीत चक्क चारशे ते पाचशे वडा-पाव विकला जातो. आज या वडा-पावची किंमत दहा रुपये आहे. केवळ चार तासात चार ते पाच हजारांचा गल्ला होतो. हा त्यांचा प्रवास नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
हा व्यवसाय त्यांनी 2003 मध्ये सुरू केला. त्यांची वडिलोपार्जित सुमारे शंभर एकराच्या आसपास जमीन आहे. पण तिथे कुसळाशिवाय काही उगवत नव्हते. कारण जत तालुका हा दुष्काळी भाग आहे. इथे प्यायच्या पाण्याचे वांदे असतात,तिथे शेतीला पाणी कुठून मिळणार? त्यामुळे उपजीविका चालवण्यासाठी काही तरी करावे लागणारच होतं. सुरुतीला काही काळ त्यांनी जतच्या साखर कारखान्यात नोकरी केली. पण तोही बंद पडला. शेवटी अनिल देशपांडे यांनी सुरुवातीला नाष्टा सेंटर सुरू करण्याचे ठरवले. सकाळी चहा, शिरा,उप्पीट असा नाष्टाचा आहार ठेवला आणि संध्याकाळी भजी सुरू केली. अर्थात कर्मठ देशपांडे घराण्याला दुषणे द्यायला काही लोक पुढे सरसावले. पण काही तरी करण्याची जिद्द होतीच.त्यामुळे अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष करण्यातच भले होते.
पण सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. पहिल्यादिवशी  अवघा 100 रुपयांचा धंदा झाला. दुसर्यादिवशी त्याच्यापेक्षाही कमी झाला. त्यामुळे नाष्टा,चहापेक्षा वडापाव सुरू करण्याचा बेत केला. साधारण वडापावला मागणी संध्याकाळी अधिक असते. हा विचार करून त्यांनी फक्त संध्याकाळी तीन-चार तास वडा-पावचा गाडा चालवायचा, असा निश्चय केला.शेवटी उधार-उसनवारी करून देशपांडे वडा-पाव गाडा उभा राहिला.
सुरुवातीला वडा बनवताना भंबेरी उडायची. वडा कधी कच्चा राहायचा तर कधी तिखट-मीठचा मेळ बसायचा नाही. शिवाय अनेकदा गिर्हाइकांना बोलवायला लागायचे. अशांतूनच चवदार देशपांडे वडा साकारला. कळूहळू गर्दी वाढू लागली आणि धंद्याचा जम बसू लागला.
आज देशपांडे वड्याची तालुक्याची स्वत:ची एक ओळख आहे. संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ-नऊ शिवाय दिवसभरात कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांच्या ऑर्डरीही मिळू लागल्या. देशपांडे वड्याचा दर्जा उत्तम राखल्याने आणि त्यात कुठलीही तडजोड स्वीकारली नसल्याने वड्याला चांगली मागणी असल्याचे अनिल दाजी देशपांडे सांगतात. या व्यवसायात पडल्यावर ग्राहकांना काय हवंय, हे ते शिकत गेले. आजही ते काही ना काही शिकत असतात. आपल्या मालाचा दर्जा उत्तम राहावा, सेवा तत्पर राहावी,यासाठी ते झटत असतात.
आता त्यांचे एकच स्वप्न आहे, देशपांडे वडा सेंटरच्या शाखा व्हाव्यात. त्यादृष्टीने त्यांचे सध्या प्रयत्न चालू आहेत. जतच्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेत देशपांडे वडा-पाव सेंटरचे स्वतंत्र दालन असतं. या पाच-सहा दिवसांत सुमारे चार-पाच लाखांचा व्यवसाय होतो. शहरातल्या लहान-थोरांना देशपांडे वडा परिचित आहे. घरी पार्सल घेऊन सहकुटुंब वड्याचा आस्वाद घेणार्यांची संख्याही मोठी आहे. एकदा एका चित्रकला स्पर्धेत एका मुलाने देशपांडे वडापाव सेंटर आणि त्याची व्विक्री करणार्या अनिल यांचे चित्र काढले होते. परिचित शिक्षकाने त्यांना ते दाखवले तेव्हा त्यांना आपल्या वडापावची महती लक्षात आली. जिद्द,प्रामाणिकपणा, कष्टाला मोल नाही, हेच खरे!-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

1 comment: