Friday, November 9, 2018

काराजनगीत चाळीसहून अधिक डेंग्यूचे रूग्ण


अस्वच्छतेचा परिणाम; ग्रामपंचायत, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
 जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील काराजनगी येथे सुमारे 40 हून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली असून डेंग्यूमुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, डेंग्यूचे रूग्ण हे जत, सांगली येथे उपचार घेत आहेत. डेंग्यूच्या साथीने गावात अक्षरश: थैमान घातले आहे. याबाबत ग्रामपंचायतीला आणि आरोग्य विभागाला  कोणत्याच प्रकारचे सोयरसूतक नसल्याचे स्पष्ट होत आहे. दूषित पाणी पाण्याचा पुरवठा सातत्याने होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याची कल्पना ग्रामपंचायतीला वेळोवेळी दिली असतानाही ग्रामपंचायत गांधारीची भूमिका घेत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असणाऱया पाणी पुरवठा करणाऱया टाकीची शिडी नादुरूस्त झाल्याने टाकी गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छ केली नाही. टाकीत सोडले जाणाऱया पाण्यामध्ये टी.सी.एल. ही जलशुध्दीकरण पावडर सोडली जात नाही. यामुळे होणाऱया पाणी पुरवठयातून आळया मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. यामुळे लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे डेंग्यू, तापाचे रूग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत.
डासांनी नागरिकांची झोप उडवून दिली असताना येथील ग्रामपंचायत डास प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करायला तयार नाही. या ग्रामपंचायतीच्या अजब कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीकडे धूर फवारणीची मशिन असतानाही त्याचा उपयोग केला जात नाही. गावातील स्वच्छेतेचा तर बोजवाराच उडाला आहे.

No comments:

Post a Comment