Saturday, November 24, 2018

धार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांनी दुष्काळी जत तालुका दत्तक घ्यावा


जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी जत तालुक्यावर अभूतपूर्व परिस्थिती ओढवली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थिती लाखो रुपयांची देणगी गोळा करणार्या पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांच्या धार्मिक न्यासांनी जत तालुका दत्तक घेऊन चारा,पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यांत टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून, परिणामी चारा टंचाई व पाणी टंचाईमुळे पशुधनावर परिणाम होणार आहे. यासाठी पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील मंदिर, मस्जिद, चर्च इत्यादी सर्व प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्तांनी अलिकडेच केले आहे.पुण्यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांची बैठक घेतली होती. यात चारा छावण्यांच्या नियोजनासंदर्भात चर्चा व योग्य ती कार्यवाही करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार जत तालुका दत्तक घ्यावा व येत्या पावसाळ्यापर्यंत सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
राज्यात अनेक धार्मिक स्थळे असून या धार्मिक स्थळांकडे जमा झालेला निधी हा सार्वजनिक कामासाठी व समाजोपयोगी कामासाठी वापरायला हवा. टंचाई भागातील जनतेसाठी या निधीचा उपयोग करावा. यापूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने धार्मिक स्थळांच्या मदतीने आतापर्यंत अनेक संकल्पना राबविल्या आहेत. राज्यात डायलेसीस केंद्र सुरू केली आहेत. अनेक उपक्रम राबवले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात सामुदायिक विवाह पार पाडले गेले. गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्याचेही काम या विभागाने केले आहे. त्यानुसार चारा छावण्या सुरु कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी अन्नछत्रही सुरु करावे. सध्या राज्यात सर्वत्र टंचाईचे जे काही संकट आहे या संकटातून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी आपण सर्व प्रमुख धार्मिक न्यासाच्या विश्वस्तांनी एकत्र येवून मदत करायला हवी आहे.

No comments:

Post a Comment