Tuesday, November 6, 2018

जत तालुक्यातील प्रकल्पांमधील गाळ काढण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दोन मध्यम प्रकल्पासह 28 लघुप्रकल्प आहेत. सध्या बहुतांश प्रकल्प पावसाअभावी कोरडे असून तालुक्याला मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असून त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात साठवण होत असून या कोरड्या तलावांतील गाळ काढण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, संपूर्ण सांगली जिल्ह्यातही हीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण पाच मध्यम प्रकल्प आणि 79 लघुप्रकल्प असे एकूण 87 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्याची क्षमता 9440.20 दशलक्ष घनफूट आहे.मात्र या प्रकल्पांमध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. जत तालुक्यात 28, आटपाडी तालुक्यात 13, कवठेमहांकाळ तालुक्यात 11, खानापूर आणि तासगाव तालुक्यांमध्ये अनुक्रमे 8 आणि 7 मध्यम व लघुप्रकल्प आहेत. बहुतांश प्रकल्प हे दुष्काळी तालुक्यांमध्येच आहेत. सध्या हे प्रकल्प कोरडे आहेत.
ॠांगली जिल्ह्यात जत तालुक्यासह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाची गंभीर परिस्थिती ओढवली आहे. सध्या या तालुक्यांमधील तलाव कोरडे असून म्हैसाळ,ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांमधून हे प्रकल्प भरून घेण्याच्या सूचना असल्या तरी याला मोठ्या प्रमाणात गती नसल्याचे दिसून येत आहे. हे प्रकल्प भरून घेण्यापूर्वी या तलावांमधील गाळ काढण्यात यावा, जेणेकरून जास्त क्षमतेने पाणी भरून घेता येईल, अशी मागणी होत आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने गाळ काढण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यावर्षी अधिकचा गाळ साचून राहिला आहे. यामुळे नुकसानच होणार आहे.
या प्रकल्पांच्या माध्यमातून त्या त्या तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोटवण्यास हातभार लागला आहे. यंदाही हे तलाव भरून घेऊन पुढचे सुमारे आठ महिने किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जत तालुक्यात या म्हैसाळ योजनेच्या पाण्याने फक्त चार ते पाच लघुप्रकल्प भरून घेता येणार आहेत. उरलेले 20-22 प्रकल्प पुढचे वर्षभर कोरडेच राहणार आहेत. याठिकाणी पाणी योजनेची कालवेच पोहचली नाहीत. किमान ही चार-पाच प्रकल्प भरून घेतल्यास उर्वरीत गावांना टँकरने पाणी पुरवठा करताना या पाण्याचा उपयोग होणार आहे. आजूबाजूला पाण्याचे स्त्रोत नसल्याने पुढील आठ-दहा महिने काढणे कठीण आहे. जत शहराला पाणी पुरवठा करणार्या बिरनाळ तलावातदेखील पुरेसे पाणी नाही. त्यामुळे जतलादेखील काही दिवसांत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
ज्या तलावांमध्ये पाणी भरावयाचे आहेत, त्या तलावांमधील गाळ तातडीने काढण्यात यावा, तसेच उर्वरीत तलावांमधून गाळ काढून सज्ज ठेवायला हवेत. तालुक्यात म्हैसाळ योजनेची कामे सुरू आहेत,ती वेगाने करून पाणी साठवण्यासाठी त्यांची मदत घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. No comments:

Post a Comment