Tuesday, November 20, 2018

राजकारण्यांच्या दावणीला बांधलेली युवा पिढी भरकटली


विवाह खोळंबले; सामाजिक स्वास्थ्य बिघडले
जत,(प्रतिनिधी)-
सहनशीलता हरवून बसलेली आजची तरुण पिढी भरकटत चालली असून राजकारणी लोक त्यांचा वापर करून याचा लाभ उठवत आहेत. मात्र कोणतेही ध्येय नसलेली ही युवा पिढी गुंडगिरी आणि व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे सामाजिक समतोल बिघडत चालला आहे. पालकदेखील मुलांकडे लक्ष देत नसल्याने त्यांचे भवितव्य अंध:कारमय बनले आहे.
     जत तालुक्यात बेरोजगारी, दारिद्र्य, कुशलतेचा अभाव अशा समस्या एका बाजूला आहेतच. त्याचवेळी शेती आहे;  पण कोणी मुलगी देत नाही; अशा कात्रीत शेकडो तरुण सापडले आहेत. आता यामुळे नवीनच समस्या पुढे येत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारांही वाढ होत चालली आहे. यातीलच काही वाट हरविलेली तरुणाई ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’साठी राजकारण्यांच्या दावणीला तर काहीजण व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत आहेत.
     जत तालुक्यात अनेक कुटुंबांकडे दहा एकर ते दोनशे एकर जमिनी आहेत, मात्र पाणी नसल्याने जमिनी मोकळ्या पडल्या आहेत. आजची तरुण पिढी तर शेतीची कामे करायला तयारच नाही. त्यामुळं म्हाताऱ्या आई-वडिलांना अजूनही शेतात खपून पोटाची व्यवस्था करावी लागत आहे. तरुण वर्ग मात्र राजकारण्यांच्या वळचणीला जाऊन आपले अस्तित्व गमावून बसला आहे. दारू-गुटखा आणि तुकड्याच्या नादाने गुंडगिरी करत फिरू लागला आहे.कुठलेही ध्येय नसलेली ही पिढी फक्त मोबाईल आणि खाण्या पिण्याची चैनी यातच गुरफटून गेला आहे.
   'रिकामं मन अन् सैतानाचं घर’ असे म्हटले जाते. हाताला काम नसले की नसते उद्योग सुचतात आणि  मारामार्‍या - व्यसनाधीनता यातून वाढलेली गुन्हेगारी या परिसरात पहायला मिळत आहे. या गुन्हेगारीच्या पाठीमागे जी अनेक कारणे वर्षांनुवर्षे सांगितली जातात त्यामध्ये पैसा-संपत्ती हे प्रमुख कारण आहे.  सांगली,इस्लामपूर ,कराड, सातारा या भागातील गुंडांशी इथल्या लोकांचे संबंध गुंतले आहेत. आता पिस्तुल सह अन्य शस्त्रे सहज मिळू लागली आहेत. अनेक गुन्ह्यात जत तालुक्यातील तरुण अडकली आहेत .काही तुरुंगाची हवा खात आहेत तर काही मोकाट आहेत. आजच्या पिढीला व्यसन-गुंडगिरी यांचे आकर्षण वाढले आहे.
    सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असणार्‍या शिवाजी विद्यापीठातून दरवर्षी सुमारे 50 हजार विद्यार्थी विविध प्रकारच्या पदव्या (बी.ए., बी.कॉम. ते बी.एड्., बी.बी.ए., बी.सी.ए.) घेऊन बाहेर पडतात. सन 2018 च्या पदवीदान समारंभामध्ये देखील 50 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले. प्रतिवर्षी या तीन जिल्ह्यांत 50 हजारांच्या 10 टक्के म्हणजे 5 हजार जणांनादेखील सर्व प्रकारच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळत नाहीत, हे विदारक वास्तव आहे. जत तालुक्यात तर रोजगाराची कोणतीच संधी नसल्याने काही प्रामाणिक तरुण कोल्हापूर, पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी दहा-पंधरा हजार रुपयांत राबवायला गेली आहे. एवढ्या पैशांत ते स्वतः चा खर्च भागवू शकत नाहीत, तेव्हा गावी असलेल्या आई वडिलांना काय पैसे पाठवणार,असा प्रश्न आहे. पण ही पिढी काही का असेना आपल्या पोटापाण्याच्या मार्गाला तरी लागली म्हणता येईल ,मात्र गावात राहिलेल्या तरुण पिढीच्या पुढे मात्र मोठे प्रश्न उभे आहेत.
तरुणांपुढे 'आयकॉन' राजकारणी
आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ही पिढी भरकटत चालली आहे. जिद्द, मेहनत यांच्या बळावर व्यवसाय, उद्योगात यश मिळवलेल्या लोकांचा आदर्श तरुणांपुढे नाही. वाचन कमी झाल्याने त्यांच्या पुढे फक्त राजकारणी एकच आदर्श दिसत आहेत. सरकारी आणि पोलीस खात्यात, समाजातला वट यावर तरुण पागल होत आहेत. राजकारणी लोक आपल्या जीवावर राजकारण करीत आहेत, याचा मागमूसही नाही. आपल्या देशात सर्वाधिक चर्चा ही फक्त राजकारणावर होत असते. प्रसारमाध्यमे देखील त्यावरच अधिक लक्ष केंद्रित करून आपला टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. राजकारणावर चर्चा कमी आणि विज्ञान, तंत्रज्ञान ,उद्योजक यावर चर्चा अधिक व्हायला हवी आहे. तरच तरुण पिढीला भवितव्य असणार आहे.
लग्ने जुळेनात, सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम
बहुसंख्य युवकांनी कला - वाणिज्य - विज्ञानसारख्या पारंपरिक पदव्यादेखील रडत - खडत का होईना पण घेतल्या आहेत. परंतु हाताला काम नाही, अशी स्थिती आहे. काहींना शेती आहे, पण शेतकरी म्हणून कोणी मुलगी देत नाही. कृष्णा-वारणाकाठासह अनेक गावांमध्ये 10-20 ते 40-50 अशी मुलांचे लग्‍नाचे वय उलटत गेले तरी त्यांचे लग्‍न ठरत नाहीत. पूर्वी ग्रामीण भागामध्ये 20-22-25 वयापर्यंत मुलांचे विवाह केले जायचे. पुढे उच्च शिक्षण-नोकरी मिळण्यासाठीचा व आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्याचा कालावधी विचारात घेता 26-29 अशा वयापर्यंत विवाह लांबू लागले होते. मुलगी ही शिक्षित-उच्चशिक्षित असो वा नसो, पण अशा विवाह इच्छुक मुलींनी नोकरीच्याच मुलांना पसंती दिली आहे. साहजिकच इथल्या तरुणाईचा अन् त्यांच्या पालकांच्या चिंतेचा प्रश्‍न खूपच गंभीर बनत चालला आहे.

No comments:

Post a Comment