Thursday, November 22, 2018

जत बसस्थानक सोलनकर चौकात हलवण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात होत असलेली वाहतूक कोंडी आणि गुहागर-विजापूर या राष्ट्रीय मार्गाचा होत असलेला विस्तार पाहता सदर बसस्थानक समस्यांच्या घेर्‍यांमध्ये अडकले आहे. राज्य परिवहन महामंडळाने मध्यवर्ती बसस्थानक सोलनकर चौकाजवळ असलेल्या आगाराच्या जागेत हलवावे, अशी मागणी जत तालुका विकास मंचने केली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सध्या असलेले बसस्थानक 1966 पासून कार्यरत आहे. शिवाय या इमारतीचे 2009 मध्ये नुतनीकरण करण्यात आले आहे. मात्र या बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलनकर चौक ते विजापूर रोड हा अर्धा किलोमीटरचा रस्ता पार करायला वाहन चालकांना पंधरा मिनिटे ते अर्धा तास लागत आहे. सध्या या गुहागर- विजापूर या मार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. यामुळे बसस्थानकाचा काही भाग त्यात जाणार असून पुन्हा येथील प्रवाशांना अडचणी उभ्या राहणार आहेत. 
सध्या जत शहरातून सांगोला-जत (एनएच-935जी), गुहागर-विजापूर (166इ) आणि कराड-तासगाव-जत (एनएच266) जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. अजूनही दोन राष्ट्रीय महामार्ग जत तालुक्यात मंजूर आहेत. त्यांचीही कामे यथावकाश सुरू होतील. हे रस्ते पूर्ण झाल्यावर जत बसस्थानकातून जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. शिवाय सध्या जी बसस्थानकाची इमारत आहे, ती खूपच गैरसोयीची आहे. त्यामुळे सदर बसस्थानक आगाराच्या सोलनकर चौकाजवळील जागेत बांधण्यात यावे, अशी मागणी तालुका विकास मंचने केली आहे.

No comments:

Post a Comment