Thursday, November 8, 2018

जत शहरात भुयारी ड्रेनेजची सोय करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरात नगरपरिषदेची स्थापना होऊन पाच वर्षे झाली तरी रस्ते,गटारी आणि भुयारी ड्रेनेजची सोय नसल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येत असून यामुळे शहरातल्या मुख्य भागात दुर्गंधी सुटत आहे. त्याचबरोबर दलदल माजत आहे. नगरपरिषदेने प्राधान्याने शहरातील मुख्य भागात ड्रेनेजची सोय करावी, अशी मागणी जत तालुका विकास मंचचे अध्यक्ष नजीर नदाफ यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
जत शहराचा विस्तार वाढत आहे. लोकसंख्येच्या मानाने शहरात सोयी-सुविधा मात्र म्हणाव्या अशा झाल्या नाहीत. जतला नगरपरिषद होऊन पाच वर्षे उलटून गेली आहेत. एक पंचवार्षिक निवडणूकही झाली.पण शहराचे प्रश्न मात्र तसेच राहिले आहेत. शहरात शौचालयांची, स्वच्छतागृहांची कमतरता आहे. रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे. अनेक प्रभागांमध्ये रस्ते, गटारी नाहीत. त्यामुळे नागरिकांना असुविधांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात तर लोकांचे मोठे हाल होत आहेत.दलदल, खड्ड्यांना सामोरे जावे लागत आहे. गुहागर-विजापूर या रस्त्यावरील धुरळ्याने लोकांचे जगणेच अवघड करून सोडले आहे.
शहराच्या मुख्य भागात म्हणजेच बसस्थानक,महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, शाळा क्र.3 चा परिसर, कलाल गल्ली, तेली गल्ली, मारुती मंदिर ते नगरपरिषदपर्यंत गटारीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी कसलीच व्यवस्था नाही. पावसाळ्यात गटारीचे पाणी निलसागर लॉज परिसरातल्या लोकांच्या घरात घुसते. या मैलामिश्रित पाण्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात भुयारी ड्रेनेजची नितांत आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीचा कारभार संपून नगरपरिषदेचा कारभार सुरू झाला तरी अद्याप ड्रेनेज व्यवस्था होऊ शकली नाही. गेल्या वर्षभरापासून शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.वास्तविक सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. गटारी बंदिस्त असणे गरजेचे आहे. शिवाय बाजार पेठेत गटारीची व्यवस्थाच नाही. या सर्व सोयी-सुविधा नगरपरिषदेने करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी टप्प्या-टप्प्याने शहरातील ड्रेनेजची कामे करू, असे लेखी आश्वासन दिले आहे.No comments:

Post a Comment