Tuesday, November 6, 2018

जत तालुक्यात विहिरी,कूपनलिका,तलाव कोरडे


पाण्याच्या टँकरला प्रशासनाचा खोडा;जनावरांची उपासमार सुरू
जत,(प्रतिनिधी)-
कायमच दुष्काळाचे चटके सोसणार्या जत तालुक्याला यंदाही पावसाअभावी तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या मोसमात फक्त जेमतेम पावणे दोनशे मिलीमीटर पाऊस झाला असल्याकारणाने शेती आणि पिण्याच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील तलाव कोरडे पडले आहेतच, शिवाय विहिरी,कूपनलिकांमध्येसुद्धा पाण्याचा थेंब नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्यात आली आहे,मात्र प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
यंदाच्या मोसमात पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरिप हंगामाबरोबरच रब्बी हंगामदेखील वाया गेल्याने अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. शेतीच्या पाण्याचा तर प्रश्नच उरला नाही.पण पिण्याच्या पाणी टंचाई तीव्रता कमालीची वाढली आहे. आजच्या घडीला तब्बल 53 गावांपेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. खरिप,रब्बी हंगामात सामान्य शेतकर्यांच्या हाताला काहीच लागले नाही,पण जिवापाड जपलेल्या द्राक्ष यापुढे कशा जगवायच्या असा मोठा प्रश्न द्राक्ष बागायतदार आणि डाळिंब बागायतदारांपुढे पडला आहे. काहींनी टँकरने पाणी आणून बागा जागवल्या आहेत, आता त्यांचीदेखील क्षमता संपली आहे. त्यामुळे बागायतदार बागा उपसून टाकण्याचा विचार करत आहे. कित्येक ठिकाणी द्राक्ष बागांची छाटणीदेखील खोळंबली आहे.
जत तालुक्यात सुमारे 6 हजार 670 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. या सर्वच बागा अडचणीत आल्या आहेत. पाण्याचा स्त्रोत कमी होऊ लागल्याने पाणी आणायचे कोठून असा प्रश्न पडला आहे. भूजल सर्व्हेक्षणानुसार तालुक्याची पाण्याची पातळी 214 मीटर खाली गेली आहे. यामुळे तालुक्यातील तलाव,कूपनलिका, विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. साहजिकच दोन्ही हंगाम वाया गेल्याने जनावरांच्या चार्याचादेखील प्रश्न उपस्थित झाला आहे. पाऊस झाला नसल्याने सध्याच्या घडीला रानोमाळी फक्त कुसळांचे साम्राज्य दिसत आहे. शासनाने चार्याची उपलब्धता तातडीने करून देण्याची आवश्यकता आहे. तालुका दुष्काळी जाहीर केला असला तरी उपाययोजना मात्र अद्याप दिसत नाहीत. तातडीने मदत मिळण्याची गरज असून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
दुष्काळी प्रश्नामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकिकडे उभा राहिला असताना दुसरीकडे अन्नधान्य,कडधान्य यांच्या दरात वाढ होऊ लागली आहे. महागाईनेही डोके वर काढल्याने सर्वांचीच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्वारी 40 रुपयांवर पोहचली आहे तर बाजरीदेखील दोन दिवसांत तीसच्या आसपास गेली आहे. कडधान्यांच्या किंमतीतही वाढ होऊ लागली आहे. आणखी काही दिवसांत भाजीपाला आणि फळांनाही याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून लोकांनी कसे जगायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.No comments:

Post a Comment