Tuesday, November 13, 2018

ग्रामीण भागातील मधुमेहींकडे दुर्लक्ष

जत,(प्रतिनिधी)-
मधुमेह हा रोग नसून विकार आहे, आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळवता येते असे सहजपणे म्हटले जाते. पण हा आजार खरेच एवढा दुर्लक्ष करण्याजोगा आहे का? हा खरा प्रश्‍न आहे. शहरी भागात यावर बरीच जनजागृती झाली आहे; परंतु ग्रामीण भागात या आजाराविषयी अजूनही लोकांमध्ये असंमजसपणा आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मधुमेहाबाबत सरकारी यंत्रणेचे कितपत लक्ष आहे, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
जगभरात प्रत्येक सात सेकंदाला एक मधुमेहग्रस्त रूग्णाचा मृत्यू होतो, असे कोणी सांगितल्यास त्यावर विश्‍वास बसणार नाही. पण ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने मागील वर्षी जाहिर केली आहे. इन्टरनॅशनल डायबेटीस फाऊंडेशनच्या वतीने भारतातील मधूमेही रूग्णांबाबत एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार भारतातील मधुमेही रूग्णांचे सर्वसाधारण वय 42 वर्षे असून, भारतात सध्या सुमारे 7 कोटी 29 लाख 46 हजार रूग्ण या व्याधीने ग्रासलेले आहेत. प्रौढांमधील मधुमेहींचे हे प्रमाण 8.8% आहे. या  त्रोटक आकडेवारीवरून या आजाराची व्याप्ती लक्षात येते; मात्र गेल्या दशक भरात देशात आपले हातपाय अधिक वेगाने पसरलेल्या या आजाराबद्दल शासनयंत्रणा खडबडून जागी झाली नाही, हे आश्‍चर्य आहे.
 जिल्ह्याच्या शहरी भागात जवळपास मधुमेहावर उपचार करणारी सरकारी आणि खासगी मिळून लहान-मोठी पाचशेच्यावर रुग्णालये आहेत; मात्र ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवरच बहुतांशी भिस्त आहे. काही गावांचा त्यास आपवाद आहे. पण ही संख्या अत्यल्प आहे. शहर तसेच निमशहरी भागात मेहनतीची कामे कमी झाल्यामुळे शारीरिक कष्ट कमी झाले. तर दुसरीकडे मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले. यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी, बैठे काम आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यमुळे शहरी भागात मधुमेहींचे प्रमाणही अधिक आहे; मात्र सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातून स्थलांतरित झालेली कुटूंबे, विविध कारणांनी भूमीहिन झालेले शेतकरी, तसेच यंत्रांच्या वापरामुळे कमी झालेले कष्ट यामुळे ग्रामीण भागातही मधुमेह पोचला आहे. शहरी भागातील मधुमेहींचे प्रमाण 12 टक्के तर ग्रामीण भागातील हे प्रमाण 7 टक्के आहे.ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये मधुमेहावर उपचार करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र, सध्यातरी असे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे.

No comments:

Post a Comment