Saturday, November 10, 2018

दुष्काळामुळे जमिनी पडीक ठेवण्याची वेळ


जत तालुक्यातील स्थिती;चार्याअभावी जनावरे सांभाळणे कठीण
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पावसाने चांगलीच ओढ दिल्याने आता रब्बी हंगामावरही पाणी सोडावे लागले आहे. ना मान्सूनचा पाऊस ना परतीचा पाऊस बरसला. त्यामुळे अगोदर खरिप वाया गेला, आता रब्बी! तालुक्यातल्या बहुतांश जमिनी पडीक ठेवण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. काहींनी जमीन पडीक कशी सोडायची म्हणून पेरण्या केल्या पण पावसाने दगा दिलाच! आता सगळं वाळून गेलं आहे. जनावरांना चारासुद्धा शिल्लक राहिला नाही. अजून सात- आठ महिने कसे काढायचे, असा यक्षप्रश्न पशुपालकांपुढे आहे.
अलिकडच्या काही वर्षातील हा मोठा दुष्काळ असल्याचे बोलले जात आहे. सलग वर्षभर शेतातून शेतकर्यांना काहीच लागलं नाही, असं पहिल्यांदाच घडलं आहे. पावसावरची जिरायत जमीन तर आता उजाड माळरान बनली आहे. परंतु, मार्च महिन्यापासून टँकरने पाणी घालून जगवलेल्या द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागाही आता जगवणं कठीण झालं आहे.  कित्येक बागायतदारांनी द्राक्षबागांच्या छाटण्यादेखील केल्या नाहीत. यंदा द्राक्षाचं उत्पन्न तर कमी येणारच आहे.पण त्या जगवायच्या कशा असाच प्रश्न सतावत आहे.
जत तालुक्यात रब्बी ज्वारी आणि कडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतली जातात.पण पाऊस नसल्याने पेरण्याही फारच कमी ठिकाणी झाल्या. ज्या ठिकाणी पावसाच्या भरवश्यावर करण्यात आल्या, आता तिथे काही राहिलेच नाही. साहजिकच ज्वारी आणि कडधान्ये आवक कमी असल्याने त्यांचे दर भडकणारच! आता त्याची प्रचितीही सामान्य लोकांना येऊ लागली आहे. आताच ज्वारीचा दर किलोमागे चाळीस रुपयांवर गेला आहे. तब्बल दुप्पटीने ज्वारी महाग झाली आहे. कडधान्यातही मोठी वाढ होऊ लागली आहे. ज्वारीचा दर पन्नास ते साठ प्रतिकिलो जाईल, अशी शक्यता असल्याचे बोलले जात आहे. कारण जतच्या ढोण परिसरासह सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी या ज्वारीच्या पट्ट्यात पावसाअभावी ज्वारीला मोठा फटका बसला आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पावसाअभावी यंदा जनावरांना चारा उपलब्ध नाही. शेतकर्यांना दुभत्या जनावरांसाठी मिळेल तेथून चारा उपलब्ध करून आणावे लागत आहे. जत परिसरातील शेतकरी अथणी, कागवाड या कर्नाटक भागातील ऊसपट्ट्यात जाऊन ऊसाचे वाढे आणत आहेत. दोन-चार शेतकरी मिळून वाहन करून चारा आणत आहेत. शेवटी हा चारादेखील किती दिवस पुरणार आणि खर्च किती करणार, असा प्रश्न शेतकर्यांपुढे उभा आहे.साधारण गाईला दिवसाला 15 पेंढी ऊसाचे वाढे घालावे लागत आहेत. मात्र दुसरीकडे दूध उत्पादनात जवळपास 30 टक्के घट आली आहे. शिवाय दुधाला डिग्री कमी बसत असल्याने दरही कमी मिळत आहे. शेळ्या-मेंढ्या तर खायला काहीच उगवलेलं नाही. माळरानावर आता वाळलेली कुसळंच दिसत आहेत. थोड्या फार पावसाने हिरवे झालेले माळरान सुकून गेले आहे. सध्या कशीबशी जनावरांची गुजरान सुरू आहे.
यंदा पाऊस पन्नास टक्केदेखील झाला नाही. साहजिकच बहुतांश गावांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. लोकांना आता प्यायलासुद्धा पाणी नाही. तिथे जनावरांना कोठून आणायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना चारा नाही,पाणी नाही, अशी मोठी बिकट अवस्था झाली आहे. शासनाने तातडीने जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वाढू लागली आहे.   No comments:

Post a Comment