Monday, December 10, 2018

जत तालुक्यात तुरीच्या उत्पादनात 80 टक्के घट

जत,(प्रतिनिधी)-
परतीच्या पावसाने दिलेली दडी, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. शेंगा कमी लागल्या आहेत. शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन कमी होणार आहे. उत्पादनात ८० टक्क्याने घट होणार आहे.

तालुक्यात कडधान्य म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, कमी पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने शेतकऱयांचा हे पीक घेण्याकडे गेल्या पाच वर्षापासून कल वाढला आहे. तूर, तीळ, करडई, भुईमूग, सोयाबीन, मटकी ही गळीत व कडधान्य पिके घेतात. यंदा पाऊस पडेल, या आशेवर ५ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्यात आली आहे. पण परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. पावसाअभावी प्रतिकूल हवामानामुळे फूलगळही झाली आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात ८० टक्के घट होणार आहे.
तालुक्यातील पहिल्या पावसाने शेतकऱयांनी तुरीची पेरणी केली होती. हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल असे सांगितले होते. पण पाऊस कमी झाल्याने अपेक्षित वाढ झाली नाही. तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला ५४५० रुपये आहे. कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना क्विंटलला ५०० रुपये अनुदान देते, तर राज्य शासन तुरीला का अनुदान देत नाही. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने सरकार तूर खरेदी करते. गावातील सेवा सोसायटीला खरेदी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर मग आमचे शासन शेतकऱ्यांना सवलत का देत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एकरी खर्चावर दृष्टिक्षेप...
मशागत : २१०० रुपये, पेरणी : ५०० रुपये
बियाणे : ५०० रुपये, दोन वेळा कोळपणी : १००० रुपये
चार फवारण्या : १६०० रुपये, काढणी : २००० रुपये

तूर पेरणी क्षेत्र...
गेल्यावर्षी झालेली पेरणी : ७ हजार १०० हेक्टर
यावर्षी झालेली पेरणी : ५ हजार ३२ हेक्टर

No comments:

Post a Comment