Monday, December 31, 2018

फेब्रुवारीमध्ये येणार शिक्षक भरतीसाठी 'अच्छे दिन'

जत,(प्रतिनिधी)-
राज्यात पवित्र पोर्टलमार्फत होणार्‍या शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या तब्बल दीड ते दोन लाख उमेदवारांसाठी नवीन वर्षात आंनदाची बातमी आहे. येत्या 16 ते 22 फेब्रुवारीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या सहा वषार्र्ंपासून शिक्षक भरतीची वाट पाहणार्‍या उमेदवारांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

     राज्यात अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी दिलेले 1 लाख 71 हजार 348 उमेदवार आहेत. त्यापैकी 1 लाख 21 हजार 615 उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर माहिती भरली आहे. तर 49 हजार 733 विद्यार्थ्यांनी पोर्टलवर माहितीच भरलेली नाही. यातील 13 हजार 93 विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी 1 लाख 8 हजार 464 उमेदवार पात्र ठरले आहेत. यांच्यापैकी अंदाजे 20 हजार जागांवर शिक्षक भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
     शिक्षक भरती करण्यासाठी ‘पवित्र’ निवड प्रक्रिया ठरविण्यात आली आहे. त्यानुसार येत्या काळातील निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी, म्हणजेच 22 फेब्रुवारीपयर्र्ंत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार बिंदू नामावली अद्ययावत करणे, एसईबीसी प्रवर्ग विचारात घेऊन, बिंदू नामावली विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे पाठवून अद्ययावत करून घेणे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ‘पवित्र’ प्रणालीवरील त्यांच्या व्यक्तिगत माहितीमध्ये बदल करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापुढे सर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे, तसेच संचमान्यतेतील गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती बिंदू नामावलीनुसार ‘पवित्र’ प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया 5 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
    10 जानेवारीपर्यंत बिंदू नामावली आणि जाहिरातीस सक्षम प्राधिकार्‍यांकडून मान्यता देण्यात येणार आहे. 20 जानेवारीपर्यंत संस्थांच्या मागणीनुसार ‘पवित्र’ पोर्टल तसेच वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 27 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत शिक्षण संचालकांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची निवड सूची जाहीर करून, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच, उमेदवारांचा पसंतीक्रम व गुणवत्ता विचारात घेऊन, रिक्त पदांसाठी एकास पाच याप्रमाणे उमेदवारांची निवडसूची संस्थांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखती घेता येणार आहेत. संस्थांना 14 ते 15 फेब्रुवारीपर्यंत मुलाखतीचा निकाल व गुणपत्रक पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.  15 फेब्रुवारीलाच मुलाखतीचा निकाल उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. त्यानंतर 16 ते 22 फेब्रुवारीपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असून, ज्या 13 हजार 93 उमेदवारांचे व्हेरीफिकेशन झालेले नाही त्या उमेदवारांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अखेर शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment