Friday, December 7, 2018

गोवर लसीकरणाची पालकांनी घेतली धास्ती


आरोग्य व शाळा प्रशासनाची जबाबदारी वाढली
जत,(प्रतिनिधी)-
गोवर लसीकरणानंतर मुलांना आलेली रिअॅक्शन किंवा अन्य परिणाम यामुळे मुलांपेक्षा पालकांनीच अधिक धास्ती घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यात तर पन्नास टक्के पालकांनी आणि शाळांनी लस घेण्यास नकार दिल्याचे वृत्त पसरले आहे. पाच्छापूर, दरिबडची आणि जतमधील काही शाळांमधील मुलांना लसीनंतर झालेल्या त्रासामुळे लसीकरणादिवशी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसू लागली आहे.

गोवर रुबेला लसीकरणाच्या गैरसमजातून शहरातील शाळांमध्ये तसेच तालुक्यात लसीकरण मुलांना अन् भीती पालकांना, अशी स्थिती पाहायला मिळत आहे. मुलांसह पालकांच्या चेहर्यावर तणाव दिसत आहे. लसीकरण झाल्यावर मात्र पालक निर्धास्त घरी गेले. लसीकरणानंतर ताप, लसीची जागा दुखणं, थोडेफार पुरळ येणं अशी तुरळक लक्षणं दिसल्यास त्याचा फार ताण घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही पालक शाळेच्या आवारात थांबून होते. प्राथमिक, अंगणवाडीमध्ये शिकत असणार्या मुलांच्या पालकांची सर्वाधिक गर्दी होती. शाळेच्या आवारात तब्बल चार तास महिला पालक खाली बसून होत्या.
प्रत्येक ठिकाणी  स्वतंत्र वर्गात लसीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. 200 मुलांना एक वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लसीमुळे डास चावताना होते, त्याच्याही पेक्षा कमी वेदना होत होती. मात्र इंजेक्शन पाहून मुलं घाबरत होती. पालकांना जीवघेण्या रिअॅक्शनची अनेकांना भीती वाटत होती. मात्र त्यातून कोणाच्याही जिवाला धोका होणार नाही याबाबत पालकांना सूचना दिल्या होत्या. अशी कुठलीही रिअॅक्शन आल्यास तिचे उपचार करण्यासाठी लस देणारी टीम सज्ज होती. तालुक्यात सर्वत्र कर्मचारी उपलब्ध होतील तसे मुलांना लसी दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता कोणत्याही मुलाला त्रास झाला नाही. लस दिल्यावर मुलांना स्वतंत्र अशा वर्गखोल्यांमध्ये बसवले जात होते. काही ठिकाणी मनोरंजनासाठी साधने उपलब्ध केली होती.
गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राज्यात राबवली जात आहे. राज्यभरातील नऊ महिने ते 15 वर्षांखालील तीन कोटी 38 लाख बालकांना शासनातर्फे या दोन लसी एकत्रित मोफत दिल्या जाणार आहेत. जत शहरातील या वयोगटातील चार-पाच हजार मुलांना लसीकरण केले जाणार आहे. सर्व माध्यमातून या लसींविषयी जोरदार जनजागृती केली तरीही अनेकांच्या मनात त्याविषयी संभ्रम आहे. या लसीकरणाचा मूळ उद्देश, संदर्भ, मोहिमेचे भवितव्य आणि लसींचे परिणाम आणि दुष्परिणाम याविषयी शंका-कुशंका होत्या. यामुळेच पालकांनी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment