Saturday, December 29, 2018

कुंभारीचे सुपुत्र डॉ. एस.आय. पाटील सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु


जत,(प्रतिनिधी)-
सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी पुण्याच्या सावित्रीबाई फुलेे विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रा. डॉ. एस. आय. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ही नियुकती केली आहे. डॉ. पाटील हे जत तालुक्यातील कुंभारी गावचे सुपुत्र आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर सर्वच विद्यापीठांना प्र कुलगुरू हे पद मंजूर झाले आहे. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या प्र कुलगुरूपदाचा मान डॉ. पाटील यांना मिळाला आहे. डॉ. पाटील हे पदार्थविज्ञान विषयाचे प्राध्यापक असून त्यांनी पुणे विद्यापीठातील या विभागाच्या विभागप्रमुखाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सिनेट, व्यवस्थापन परिषद तसेच उच्च शिक्षणातील महत्त्वाच्या परिषदांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. संशोधनाबरोबरच प्रशासनातही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पी.एचडी पदवी प्राप्त केली आहे. उच्च शिक्षण क्षेत्राचा एक दांडगा अभ्यास व अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध पारितोषिके त्यांना मिळाली आहेत.
शुक्रवारी राज्यपाल कार्यालयाकडून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. येत्या तीन-चार दिवसात ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या कुंभारी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment