Tuesday, December 11, 2018

तुरची-बबलेश्‍वर पाणी योजनेचा श्रेयवाद रंगला


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बहुचर्चित कर्नाटक राज्यातील आणि जतच्या सीमावर्ती भागाला गरज असलेल्या तुरची-बबलेश्वर पाणी योजनेचे कशात काय नसताना ? स्थानिक नेत्यांत मात्र यावरून खूपच श्रेयवाद रंगला असून विनाकारण आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रत्यक्षात मात्र या योजनेचे पाणी जत पूर्वभागाला देण्यासाठी दोन्ही राज्याच्या शासन पातळीवरून काहीच हालचाली दिसून येत नाहीत.

जत तालुक्यातील जिरायत व बागायती शेती लहरी पावसावर अवलंबून आहे. 1960 पासून स्थानिक व जिल्ह्यातील राजकर्त्यांनी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना आणल्याच्या वल्गना केल्या व आजही काही नवीन पाणी योजना आणल्याच्या कल्पना केल्या जात आहेत. पश्चिम- उत्तर भागात काही गावात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. जतच्या संपूर्ण शिवारात पाणी येईल, या अपेक्षेने शेतकरी दिवस काढत आहेत. विजयपूर जिल्ह्यातील आणि अगदी जत सीमेला लागून असलेल्या यत्नाळ व परिसरातील गावांना पाणी देण्यासाठी कर्नाटक राज्याने तुरची-बबलेश्वर योजना आणली आहे. या पाणी योजनेद्वारे बंदिस्त वितरिकेतून दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी कर्नाटकाने कंबर कसली आहे. ही योजना युद्धपातळीवर राबवून जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील तलावात पाणी भरून घेण्याचे काम कर्नाटक शासनाकडून सुरू आहे. कर्नाटक शासन महाराष्ट्र राज्याकडून पाणी घेऊन जतच्या संलग्न असलेल्या अथणी, विजयपूर आणि इंडी तालुक्यातील शेवटच्या गावातील शिवारात पाणी पोहोचवते; मग महाराष्ट्र शासनाला का जमत नाही, असा सवाल व्यक्त होत आहे.
 काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांनी या योजनेचे पाणी जत पूर्वच्या 42 गावांना आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आता आमदार विलासराव जगताप समर्थकांनी पूर्णत्वास आलेल्या या योजनेची पाहणी करून या योजनेतून जत पूर्वला पाणी देणे शक्य असल्याचे आणि त्यासाठी खासदार व आमदारांच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जाहीर केल्याने दोन्ही बाजूकडून टीकास्त्र सोडले जात आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना दोन राज्यांशी संबंधित असल्याने जलसंपदा विभागाकडून पाणीवाटप करार होणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेवरून विनाकारण श्रेयवाद रंगला आहे.

No comments:

Post a Comment