Tuesday, December 11, 2018

येळदरी जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील येळदरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला गणित विषय शिकवन्यासाठी नेमणूक  केलेल्या शिक्षिका यांना गणित विषय शिकवता येत नाही. त्यांची बदली करून त्यांच्या जागी दुसऱ्या  गणित शिक्षकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी मंगळवारी येळदरी ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले. या गावात पहिली ते आठवीपर्यत  जि.प. ची शाळेची व्यवस्था आहे.  ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याने इतर शिक्षक व विद्यार्थी   शाळाखोली बाहेर रिकाम्या जागेत  बसले .

याबाबतची अधिक माहिती अशी, येळदरी जिल्हा परिषद शाळेतील गणित शिक्षकाची बदली झाली .त्याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने देवमाने या शिक्षिकेची नियुक्ती झाली. देवमाने यांना गणित विषय शिकवण्यास येत नसल्याबाबत तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव उतरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षण विभागाकडे केली. या तक्रारीची दखलच घेतली गेली नाही. दरम्यानच्या काळात उतरे व शिक्षिका देवमाने यांच्यात वादही झाला. आपण समाजशास्त्राचे शिक्षक असल्याचे सांगत त्यांनी गणित विषय शिकवता येत नसल्याचे सांगितले. उतरे यांनी शिक्षिका बदलावी अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार  उतरे व गावातील  ग्रामस्थांनी मंगळवारी शाळेला टाळे ठोकले. याप्रकरणी शिक्षण विभाग काय निर्णय घेतात  याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment